- शिवरायांचे आठवावे रूप |
- शिवरायांचा आठवावा प्रताप |
- शिवरायांचा आठवावा साक्षेप |
- भूमंडळी ||
जाणता राजा हा मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रम. राज्याभिषेकाची ती आनंदपर्वणी सुरु झाली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची गगनभेदी ललकारी ऐकली. अंगावर रोमांच उभे राहिले. डोळे आनंदाने पाणावले नि मती कुंठित झाली. मनात विचार चमकून गेला शिवबा तुम्ही आजही हवे होते. कल्पनाविश्वात रमण्यापूर्वीच ‘हर हर महादेव’ चा महामंत्र कानांत घुमू लागला. शिवरायांचे शौर्य तळपत्या तलवारीप्रमाणे डोळ्यांपुढे दिसू लागले. त्यांचा मार्गच शौर्याचा, शस्त्रांचा, गनिमीकाव्याचा आणि हिंदवी स्वराज्य घडविण्याच्या स्वप्नपूर्तींचा. तळमळ होती जनतेच्या कल्याणाची नि धर्माच्या उत्थानाची.जनहितार्थ काहीतरी दाखवून दाखविण्याची आणि लोकांना एकत्र आणून त्यांच्या भरवशाची, त्यांच्या आयुष्याला कलाटणी देऊन स्थिरस्थावर करण्याची.
आज शिवबा असते तर महाराष्ट्रच नव्हें तर साऱ्या भारतदेशाचे चित्र वेगळेच दिसले असते. जाति धर्मभेदाच्या या शृंखला कुठेच दिसल्या नसत्या. शिवरायांच्या घोड्यांच्या टापांचे ध्वनी साऱ्या परिसरात दुमदुमले असते. स्त्रियांच्या अब्रूवर हात टाकणाऱ्याचे हातही भीतीने कापले असते. शिवबा तुम्ही आज असता तर गल्लाभरू नेतेमंडळी मोडीत निघाली असती. गरिबांचा वाली म्हणून तुमची ख्याती देशभर पसरली असती. आतंकवादी सोडाच पण देशद्रोहीदेखील कुकर्म विसरला असता.कोणतेही कुकर्म करण्यापूर्वी त्याने दहा वेळा विचार केला असता. तुमच्या नावातच इतकी दहशत आहे की त्याचे हात थरथर कापले असते. शिवरायांकडून कोणती शिक्षा होईल त्याच्या कल्पनेनेही त्याच्या अंगावर भीतीचे रोमांच उठले असते. देशाचा सर्व कारभार एक हस्ती आणि रणवीरधुरंधर अशा महाराजांकडून झाला असता.सर्व जनता निरपेक्ष भावनेने आपले समजून वागली असती. लोकांच्यात बंधुभाव, न्याय, समता, प्रेम, नीती यांची जाणीव झाली असती.
देशाचा कारभार सुरळीत चालू असता. शिवबा तुम्ही आज असता तर राजकारण बोकाळले नसते. सीमा सुरक्षेसाठी असणारे जवान तळहातांवर प्राण घेऊन देशाच्या रक्षणासाठी लढले असते. त्यांच्या शौर्याची तुम्ही दखल घेऊन त्यांच्या पाठीवर तुमच्या शाबासकीची थाप पडली असती. देशातला प्रत्येकजण शत्रूचा नायनाट करायला त्वेषाने चेतला असता. देशातील तानाजी सूर्याजी नि बाजीप्रभूच्या शौर्याचे पोवाडे घराघरांत ऐकले असते. राजे कुळवाडी आपल्या शेतांत राबून अन्नधान्य पिकवतो. त्याच्या मालाचा योग्य मोबदला तुम्हीच दिला असता. अन्याय अज्ञान दूर करण्यासाठी तुम्ही पराकोटीचे प्रयत्न केले असते. हल्ली चाललेला भ्रष्टाचार लाचलुचपतीला तुम्ही लगाम लावला असता. राजे देशभर घोडदौड करून तुम्ही प्रजेच्या हिताची एखाद्या पित्याप्रमाणे काळजी घेतली असती. राजे स्त्रियांवरील अत्याचाराला वाचा फोडून तुम्ही मोकाट गुन्हेगारांना नक्कीच शासन केले असते. तरुणांना व्यसनांच्या नि कुकर्मांच्या विळख्यात अडकवणाऱ्यांना जरब बसवली असती. भरकटलेल्या युवकांना मार्गदर्शन करून त्यांच्यात अमुलाग्र बदल घडवला असता.
पण शिवबा आजचा हा चंगळवाद पाहून तुमची गात्रे नक्कीच थरथरली असती.
त्यामुळे हिंदवी स्वराज्याची दुर्दशा नि वाताहात ‘याचि देहा याचि डोळा’ पाहण्याऐवजी भवानीमातेला नको आता मनुष्यधर्म म्हणून विनवले असते. या हिंदभूमीचे पुन्हा नंदनवन करण्याची रायरेश्वराकडे शक्ती मागितली असती. पण शिवबा तुम्ही या पापभूमीत जगूच शकला नसता.आज आम्ही पापाच्या तळागाळात इतके रुतलेले आहोत की वर काढण्यासाठी कुणीही वाली उरला नाही. आणि परतीचे मार्गही बंद झालेले आहेत. आज तुमची खुप आठवण येते आहे. राजे, तुमच्या राज्यात अंदाधुंदी गैर राज्यकारभार कधीही घडला नव्हता. तुम्ही त्यांना कधीही माफ केले नव्हते. परंतु हल्ली सुराज्यकारभार जिथे होतच नाही असा हा आमचा भारत देश भ्रष्टाचार, नीतीशून्य मूल्यांनी बोकाळला आहे. इथे सर्वजण आपलीच तुंबडी भरण्यासाठी मश्गुल आहे.दुसऱ्याकडे पाहण्यासाठी ही कोण कोणासाठी वेळ देऊ शकत नाही. ‘हम करे सो कायदा’ या न्यायाने इथे लोकशाही नांदते आहे.राजे ज्या माऊलीने तुम्हावर इतके चांगले संस्कार केले, ज्या गुरुजींनी तुम्हाला युद्धनीती आणि राज्यकारभाराचे धडे दिले, तेही आज पैशाच्या पाठीमागे लागले आहेत. आई, वडील, भाऊ, बहिण या नात्यांमध्ये काहीच अर्थ उरलेला नाही. स्वार्थाची बजबजपुरी झालेली आहे. ‘आपले कोण परके कोण’ हेच ओळखू येत नाही हल्ली.
राजे, तुमच्या राज्यात निर्धास्तपणे वावरणारा माणूस आज मुठीत जीव घेऊन रोज वागत आहे. आजचा दिवस आपला समजून जगत आहे. कुठून कोणते संकट घाला करेल काहीही सांगू शकत नाही. कोणाचा पायपोस कोणालाही उरलेला नाही. जो तो स्वतःतच दंग आहे. या गोष्टीला कुठे शेवट आहे हेही कळत नाही. राजे, तुमची जनता भरकटली आहे हो! तिला स्थिरस्थावर करण्यात, जागेवर आणण्यात कोणीही उत्सुक नाही. राजे, पुनर्जन्म घ्याल का? या तुमच्या लेकरांना तुमचा सहारा द्याल का? वास्तविक शिक्षणाने माणूस सुसंस्कारी बनतो. परंतु इथे उलटेच होऊन बसले आहे. शिक्षणाचा अहंभाव, गर्व इतका वाढीस लागला आहे की मी म्हणजे कोण! असे कॉलर ताठ करुन प्रत्येक जण वावरत आहे. ‘दुनिया मेरी मुठ्ठीमें’ अशीच भावना हर एकाची इथे जाणवत आहे. राजे, तुमच्यातली लढाऊ वृत्ती आता कोणाकडेही उरली नाही.’असतील शिते तर जमतील भुते’ या न्यायाने ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे लोकं खेचली जात आहेत.
सौ.भारती सावंत
- मुंबई
- 9653445835