मुंबई : राज्यात कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग वाढत असताना राज्य सरकारने घेतलेला शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यातच सद्यस्थितीत ओमिक्रॉन विषाणू सापडलेल्या मुंबई आणि पुण्यातील शाळा सुरू होणार की नाही हाही प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यावर आता राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी उत्तर दिले आहे.
वर्षा गायकवाड म्हणाल्या, आम्ही जेव्हा नियमावली बनवली तेव्हा प्रत्येक गोष्टीचा पूर्ण विचार करून नियम बनवले. आम्ही टास्क फोर्ससोबत सातत्याने बोलत आहोत. ही नियमावली टास्क फोर्सला देखील पाठवली. त्यावर चर्चा झाली आणि मग ही नियमावली (एसओपी) निश्चित झाली. याशिवाय काही निर्णय घ्यायचा झाला तर परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. परीक्षा असो की इतर गोष्टी आम्ही त्यावर लक्ष ठेऊन आहोत. त्यानुसारच भविष्यात निर्णय घेण्याचा आमचा प्रयत्न आहे.
आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. ज्या ज्या वेळी अशी परिस्थिती निर्माण झाली त्या त्या वेळी शाळा बंद करण्याचे अधिकार स्थानिक स्तरावर देण्यात आले. शाळा सुरू करायची की नाही याचाही निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे मुंबई, पुणे या शहरांच्या शाळेत १५ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याबाबत विचार होत आहे. हे सर्व लक्षात घेऊनच यावर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.