अमरावती : अमरावती विमानतळाच्या कामकाजाला गती मिळण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे. उपमुख्यमंत्री महोदयांनी या मागणीबाबत सकारात्मकता दर्शवली असून, विमानतळाच्या कामाला गती मिळेल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.
या मागणीचे निवेदन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी आज उपमुख्यमंत्री श्री. पवार यांना भेटून दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यावेळी उपस्थित होते. अमरावती जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने विमानतळ लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. जिल्ह्यासाठी यापूर्वीच विमानतळ मंजूर असून, या कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने विमानतळाचे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे या कामाला गती मिळण्यासाठी अंदाजपत्रक 2021-22 मध्ये पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांना केली. त्याबाबत उपमुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मकता दर्शवली असून, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
अमरावती जिल्ह्यातील वस्त्रोद्योग पार्क व त्यानुषंगाने औद्योगिक विकासाच्या मोठ्या शक्यता पाहता विमानतळ लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. येथील उद्योगवाढीसाठीही पालकमंत्र्यांकडून वेळोवेळी पाठपुरावा होत असून, मेक इन महाराष्ट्रअंतर्गत नवे उद्योगही उभारले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर विमानतळाची आवश्यकता असून, त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत उपमुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मकता दर्शवली आहे. त्यामुळे अमरावती विमानतळाचे काम लवकरच गती घेईल, असा विश्वास पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी व्यक्त केला.
Related Stories
September 5, 2024
September 5, 2024
September 4, 2024