जिंतूर : काही वर्षांपासून दहावी, बारावीचे निकाल पाहिले, तर मोठय़ा प्रमाणात टक्केवारी घेऊन विद्यार्थी पास होत आहेत, परंतु सध्याचे शिक्षण म्हणजे, केवळ पुस्तकी ज्ञान झाले आहे. याच शिक्षणाला व्यावहारिकतेची जोड देत उद्योग-व्यवसायाचे शिक्षण देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केले.
जिंतूर शहरातील छत्रपती संभाजी महाराजनगरात उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे यांच्या वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ आयोजित कीर्तन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आ.विजय भांबळे, अजय चौधरी, प्रल्हाद भांबळे आदी उपस्थित होते. आपल्या खास शैलीतून इंदुरीकर महाराजांनी शहरातील नागरिकांचे प्रबोधन केले. ते म्हणाले, सामाजिक जीवनात माणसाने आपली नीतिमूल्ये जपण्यासह समाधानी आयुष्य जगले पाहिजे. जीवन जगताना आपण समाजाचे काही देणे लागतो हा हेतू नजरेसमोर ठेवून मरणोत्तर देहदान, नेत्रदान केले पाहिजे. घरातील व्यक्ती मृत झाल्यास रक्षा इतर ठिकाणी विसर्जित करण्यापेक्षा, रक्षाविसर्जनाच्या जागी आठवणीसाठी एखादे झाड लावावे असे आवाहन केले.