मुंबई : राज्यातील कोरोना रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत असून सध्या दिवसाला ४ हजार रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे मास्क घालणे, आरोग्याचे नियम पाळणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोविडविषयक सादरीकरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
काही दिवसांपूर्वी राज्यात दर दिवशी २०० ते ३०० रुग्ण आढळत होते. आता दररोज ४ हजार रुग्ण आढळत असून रुग्ण संख्येत ३६ टक्के वाढ झाली आहे. यापैकी ९० टक्के रुग्ण मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यातील आहेत. सध्या २५ हजार सक्रीय रुग्ण असून १ टक्का रुग्ण ऑक्सीजनवर आहेत तर २२ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी दिली. रुग्णालयात ४.६४ टक्के रुग्ण आहेत. मुंबईत सध्या जवळपास ३० टक्के पॉझिटीव्हीटी असल्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवली. देशामध्ये आज ८१ हजार सक्रीय रुग्ण असून त्यातील २५ हजार एकट्या महाराष्ट्रातील आहेत.