मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शकांच्या यादीमध्ये अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचे नाव टॉपला आहे. एकापाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट प्रवीण करत आहेत. धर्मवीर, सरसेनापती हंबीरराव हे त्यांचे अलिकडेच प्रदर्शित झालेले दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. पण तुम्हाला माहित आहे का? प्रवीण यांचे शेतीवर अधिक प्रेम आहे. शेतकरी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. म्हणूनच आजही त्यांचे वडील शेतामध्ये कष्ट करताना दिसतात. प्रवीण यांनी वडिलांचा एक व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.
शेतकरी असल्याचा आपल्याला अभिमान आहे हे प्रवीण यांच्या बोलण्यामधून सतत जाणवते. प्रवीण स्वत: कामामधून ब्रेक मिळताच शेती करतात. त्यांचे वडील विठ्ठल तरडे यांचे वय आता ७९ वर्ष आहे. तरीही आज ते तितक्याच मेहनतीने शेतात काम करताना दिसतात. वडिलांच्या वाढदिवसानिमित्त प्रवीण यांनी त्यांचा शेतामध्ये काम करत असताना व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला नेटकर्यांची बरीच पसंती मिळताना दिसत आहे.
प्रवीण यांनी वडिलांचा व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे की, आज माझ्या वडिलांचा विठ्ठलरावांचा ७९ वा वाढदिवस. पुढच्या वर्षी सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा. पांडुरंगाच्या चरणी एकच इच्छा शंभरीपयर्ंत त्यांना असेच आरोग्य लाभू दे. खूप शुभेच्छा दादा. या व्हिडीओमध्ये प्रवीण यांचे वडील शेतात काम करताना दिसत आहेत. पावसाळ्यामध्ये शेतीच्या कामामध्ये ते व्यग्र झाले आहेत. तसेच या व्हिडीओमध्ये ते विठुचा गजर हरिनामाचा गाताना दिसत आहेत. काम करत असताना ते पांडुरंगाच्या भक्तीत मग्न झाल्याचं यामध्ये पाहायला मिळत आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून प्रवीण यांच्या वडिलांना अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांचं कौतुक देखील नेटकरी करत आहेत. मुलगा आज कोट्यावधी रुपये कमावत असला तरी वडील मात्र सामान्य शेतकरीप्रमाणे काम करतात.