मुंबई : राज्यात सध्या पूजा चव्हाणच्या कथित आत्महत्येवरुन चर्चा सुरू असून अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहे. भाजपाकडून वनमंत्री संजय राठोड यांचे जाहीरपणे नाव घेतले जात असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी जोपयर्ंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपयर्ंत कारवाई न करण्याच्या भूमिकेत आहे. या सर्व घडामोडींदरम्यान पूजा चव्हाणच्या वडिलांनी एका मुलाखती दरम्यान अनेक खुलासे केले आहेत.
पूजावर खूप ताण होता. तिच्या डोक्यावरील कर्ज वाढले होते. पोल्ट्री फार्मसाठी तिने कर्ज घेतले होते, यामध्ये तिचे खूप मोठे नुकसान झाले होते. यामध्ये काही होणार नाही म्हणून आपण पुण्याला जाऊन दुसरे काही तरी करते असे ती म्हणाली होती, अशी माहिती तिच्या वडिलांनी दिली आहे. आत्महत्या केली त्यादिवशी दुपारी २ वाजता माझे तिच्याशी बोलणे झाले होते. पैसे वैगेरे हवे का असे विचारले होते, त्यावर ती नको म्हणाली होती, असेही त्यांनी सांगितले आहे. पूजा प्रकरणात अनेक नावे येत असून त्यासंबंधी विचारण्यात आले असता ते म्हणाले की, हे सगळे चुकीचे आहे. कोणी कोणाचे नाव जोडून काहीतरी सांगत आहे. हे सगळे थांबले पाहिजे. पोलिसांचा तपास सुरू असताना विनाकारण आरोप कशासाठी करत आहात? माझी मुलगी गेली आहे त्यात हे ऐकून वाईट वाटते. बदनामी थांबवा असे आवाहन केल्यानंतरही बदनामी सुरू आहे हे थांबले पाहिजे. पूजा प्रकरणाशी अरुण राठोड नाव जोडणेही चुकीचे असून, त्याचा काहीच संबंध नसल्याचेही ते म्हणाले आहेत. दरम्यान मंत्र्यांचे नाव जोडले जात असल्याच्या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, मंत्री असो किंवा कोणीही असो तपासाअंती नाव आले तर कारवाई होईलच. पण सध्या कोणाचे नाव घेऊ शकत नाही. भाजपासाठी तीन वर्षे काम केले पुढे त्यांनी सांगितले की, पूजाने तीन वर्षे भाजपासाठी काम केले. तिथे कोणी काही विचारत नव्हते. काय झाले नेमके मला माहिती नाही. नुसती बदनामी सुरू आहे, पण साधा मला कोणी फोनही केला नाही. भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना सर्वांसोबत तिचे फोटो आहेत. पण कोणीही चौकशीसाठी फोन केला नाही. फक्त बदनामी सुरू आहे. सर्वांना सत्य समोर आल्यावर बोलले पाहिजे, अशी विनंती त्यांनी केली आहे.
Related Stories
September 14, 2024
September 8, 2024