- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती महापालिका क्षेत्रात येणाऱ्या वडाळी तलावाचे सौंदर्यीकरण व येथील परिसर पर्यटनदृष्ट्या विकसीत करण्यासाठी गतीने कार्यवाही करावी. या स्थळाच्या विकास कामांना चालना मिळण्यासाठी पर्यटन विभाग, वन विभाग व नगररचना विभागाने समन्वयाने कार्यवाही करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज दिल्या.
वडाळी तलाव व परिसराचे सौंदर्यीकरण व येथील निसर्ग पर्यटन विकसीत करण्याच्या दृष्टीने श्रीमती कौर यांनी पाहणी केली. त्यावेळी त्या बोलत होत्या.महापालिका आयुक्त प्रविण आष्टीकर, सहायक आयुक्त नंदकिशोर तिखीले, सहायक संचालक नगररचना रंकाळे, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, तांत्रिक सल्लागार जीवन सदार, शहर अभियंता रविंद्र पवार, प्रकल्प अभियंता राजेश आगरकर, उपअभियंता प्रमोद तिरपुडे आदी उपस्थित होते.
वडाळी तलावाचे सौंदर्यीकरण व निसर्ग पर्यटन क्षेत्र निर्माण करण्यासाठी महापालिकेकडुन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्या अनुषंगाने अमृत सरोवर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या निधीपैकी प्रथम 20 कोटी रुपये प्राप्त होणार असुन त्यात करण्यात येणाऱ्या कामांची माहिती श्रीमती कौर यांनी घेतली. या निधीअंतर्गत तलावातील पाण्याचे शुद्धीकरण, तलावात सोडण्यात येणाऱ्या पाण्याची शुद्धीकरण प्रक्रिया, तलाव परिसरात दगडांची फरसबंदी आदी कामे योग्य पद्धतीने करण्याच्या सुचना श्रीमती कौर यांनी संबंधितांना दिल्या.
वनविभाग क्षेत्रात येणाऱ्या परिसरात निसर्ग पर्यटन विकसीत करण्यासाठी वनविभागाने प्रस्ताव सादर करावे. या कामासाठी जिल्हा नियोजन विकास निधीतुन 1 कोटी प्राप्त होणार असल्याची माहिती संबंधितांनी दिली. या परिसरात निसर्ग पर्यटनाच्या निर्मितीसाठी पर्यटन विभाग, वनविभाग व नगरविकास विभागाने निधी उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक कार्यवाही तात्काळ करण्यात यावे, असे श्रीमती कौर यांनी सांगितले. यावेळी वनविभाग, नगर रचना, पर्यटन विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.