यवतमाळ : देशाचे महासत्तेत रूपांतरण करण्यासाठी येथील मोठ्या लोकसंख्येचे तंत्रकुशल मनुष्यबळात परिवर्तन घडवणे ही आजची सर्वाधिक महत्त्वाची गरज आहे. त्यात आपणास यश मिळाल्यास भारत निश्चितच एक जागतिक महासत्ता म्हणून उदयास येऊ शकेल, असे प्रतिपादन नागपूर-अमरावती विभागाचे माहिती संचालक हेमराज बागुल यांनी केले.
येथील शास. तंत्रनिकेतनमध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त साजरा करण्यात येत असलेल्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ या उपक्रमांतर्गत श्री बागुल दूरदृष्यप्रणालीद्वारे बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. डी. एन. शिंगाडे उपस्थित होते. या उपक्रमांतर्गत संचालक हेमराज बागुल यांचे व्याख्यान झाले. भारताला एक महासत्ता म्हणून प्रस्थापित करण्यासाठी समस्यांचे रूपांतर संधीत करण्याची गरज असल्याचे सांगून श्री. बागुल म्हणाले, आपली लोकसंख्या जास्त असली तरी तिच्या सध्याच्या रचनेमुळे त्यातील प्रॉडक्टिव पाप्युलेशन ही जवळपास ६२ टक्के इतकी मोठी आहे. जगात एवढी उत्पादनक्षम लोकसंख्या कोणत्याही देशाची नाही. परिणामी भारत हा डेमोग्राफिक डिव्हिडंडचा जगातील सर्वात मोठा लाभार्थी आहे. त्यातील पन्नास टक्क्यांहून अधिक लोकसंख्या तरुणांची आहे. हे तरुण चांगल्या पद्धतीने तंत्रकुशल झाल्यास भारत भविष्यातील जगाचे मॅन्युफॅरिंग हब सिद्ध होऊ शकेल. एक परिपूर्ण महासत्ता होण्यासाठी केवळ आर्थिक आघाडीवर काम करून चालणार नाही, असे स्पष्ट करून श्री. बागुल म्हणाले सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विविध आघाड्यांवर मोठे बदल घडले पाहिजेत. सरकार आपल्या पद्धतीने याबाबत प्रयत्नशील आहेच. प्रास्ताविकात प्रा. प्रशांत सब्बनवार यांनी या महोत्सवाच्या आयोजनामागची भूमिका विशद केली. प्रा. उज्वला शिरभाते प्रा. जी. के. यादव, प्रा. एस. बी. भोसले आदी उपस्थित होते.
Contents
hide
Related Stories
November 27, 2024