मुंबई : लसीकरणामुळे कोरोनाची तिसरी लाट रोखता येईल, असे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले. प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.
देशभरासह राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. मात्र असे जरी असले तरी अद्यापही दररोज नवीन कोरोनाबाधित आढळून येत असून, रुग्णांचे मृत्यू देखील सुरू आहेत. याचबरोबर कोरोना पाठोपाठ आज डेल्टा प्लस या नवीन आजाराने देखील डोके वर काढले आहे. या संदर्भात सर्वसामान्यांमध्ये अनेक संभ्रम निर्माण झाले असून, चिंतेचे वातावरण देखील दिसत आहे. या संदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली. या क्षणाला डेल्टा प्लसच्या संदर्भात अधिक चिंता करण्याची आवश्यकता नाही. आपण सध्या कोरोना नियमांचे पालन करून वागावे, एवढीच माझी सूचना राहील, असे टोपे म्हणाले आहेत.
माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितले की, डेल्टा प्लसच्या संदर्भात दर महिन्याला प्रत्येक जिल्हय़ामध्ये आपण साधारण १00 नमुने घेतो. प्रत्येक जिल्हय़ामध्ये दर आठवड्याला २५ नमुने घेतो आणि अशा पद्धतीने प्रती महिना आपण डेल्टा प्लसच्या सॅम्पलचे होल जीनोम सिक्वेन्सिंग करतो. हे होल जीनोम सिक्वेन्सिंग आजपर्यंत जे ४ हजार लोकांचे झाले, त्यामध्ये २१ लोक डेल्टा प्लस पॉझिटिव्ह आढळले. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला, परंतु उर्वरित सर्वजण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे एकदम चिंता करण्यासारखी परिस्थिती नाही. डेल्टा प्लसच्या गुणधर्माविषयी अद्यापही स्पष्टता आलेली नाही. वेगवेगळे तर्कवितर्क लावले जातात. परंतु आपल्या हाती असलेल्या सध्याच्या आकडेवारीच्या माहितीप्रमाणे निश्चितच जो एक मृत्यू झालेला आहे. तो केवळ डेल्टा प्लसमुळेच झाला, असे म्हणता येणार नाही. त्यामध्ये ८0 वर्षे वय, अन्य आजार होते हे देखील कारणीभूत घटक आहेत. डेल्टा प्लसच्या संदर्भात एकूण देशभरात ४८ केसेस आहेत. त्यामुळे या क्षणाला डेल्टा प्लसच्या संदर्भात अधिक चिंता करण्याची आवश्यकता नाही. आपण सध्या कोरोना नियमांचे पालन करून वागावे, एवढीच माझी सूचना राहील.
तसेच, आरटीपीसीआर ची दररोजची क्षमता ही खर्या अर्थाने, पावणेदोन लाख- दोन लाखापर्यंत आहे आणि त्या क्षमतेपर्यंत आपण आपल्या तपासण्या दररोज घेतल्याच पाहिजेत, असे देखील आम्ही आरोग्य विभागावला सूचित केले आहे. केवळ आरोग्य विभागच नाही तर वैद्यकीय शिक्षण, महापालिकेचा जो भाग असेल त्यांना देखील सूचित केले आहे की, तपासण्या अजिबात कमी करता कामा नये. कारण, चाचण्या कमी केल्याने देखील थोड्याफार प्रमाणात दररोजच्या पॉझिटिव्ह असलेल्यांच्या संख्येवर परिणाम होत असतो. लोकांनी चाचण्यांसाठी देखील सहभाग घ्यावा. तपासणी, लसीकरण याचे आवाहन नागरिकांना आहे आणि याचबरोबर कोरोना नियमांचे पालन करून वागणे हा सर्वमान्य मंत्र आहे, त्याचे पालन करावे. असे आवाहन देखील आरोग्यमंत्री टोपेंनी नागरिकांना यावेळी केले.
Related Stories
September 17, 2024
September 14, 2024