अमरावती : कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली असली तरी गाफील राहून चालणार नाही. उपचार यंत्रणा सुसज्ज करतानाच चाचण्या व सर्वेक्षणात सातत्य ठेवावे, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले. जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य यंत्रणेचा प्रत्यक्ष भेटीद्वारे आढावा घेतल्यानंतर जिल्हा प्रशासनाची बैठक पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार सुलभाताई खोडके, आमदार बळवंतराव वानखडे, जि. प. अध्यक्ष बबलुभाऊ देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस आयुक्त आरती सिंह, पोलीस अधीक्षक हरी बालाजी, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम आदी यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, बाधित संख्या कमी झाली तरी संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता चाचण्यांची संख्या कमी होता कामा नये. उपचार यंत्रणा सुसज्ज करतानाच गावोगावी ग्राम दक्षता समित्यांच्या माध्यमातून भरीव जनजागृती करावी. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना उपचाराची व्यवस्था व ३ कॉन्सनट्रेटर उपलब्ध करून देण्यात येत आहे. म्युकरमायकोसिससाठीही मोहीम राबविण्यात आली असून, कोविडपश्चात घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले जात आहे. मोझरी, वलगाव येथे उपचार सुविधेचा विस्तार, विशेषत: महिला व मुलांसाठी स्वतंत्र उपचार यंत्रणा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या परिसरात कंपन्या व स्वयंसेवी संस्थांच्या सहकायार्ने वसी एस आर मधून शंभर बेडचे रुग्णालय उभे राहत आहे. त्यानुसार नियोजित सर्व कामे वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी दिले. शासकीय रुग्णालयात २00 व्हेंटिलेटर आहेत. त्यात नादुरुस्त असतील तर ते तत्काळ दुरुस्त करून घ्यावे. आवश्यकतेनुसार व्हेंटिलेटर, खाटा, ऑक्सिजन प्रणाली आदी सर्व व्यवस्था सुसज्ज ठेवावी, असे पटोले यांनी सांगितले. सर्व विभागांनी समन्वयाने कामे करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. जिल्ह्यातील उपाययोजना, मनुष्यबळ आदी विविध बाबींचा आढावा यावेळी घेण्यात आला.
Related Stories
September 17, 2024
September 14, 2024