अमरावती : गो. सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चांदूर बाजार येथील राष्ट्रीय सेवा योजना आणि निवडणूक विभाग, तहसील कार्यालय यांच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता नवमतदार नोंदणी आणि जनजागृती विषयक अभियान राबविण्यात येत आहे. भारत निवडणूक आयोगातर्फे १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत मतदान यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. नोंदणी आणि जनजागृती अभियानांतर्गत १ नोव्हेंबर २०२१ पासून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मतदान यादीत नाव नोंदणी करिता प्रेरित करण्यात येत आहे. त्याकरिता राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी पथनाट्याद्वारे मतदान नोंदणी आणि मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले होते.
रासेयो कार्यक्रम अधिकारी यांनी नायब तहसीलदार श्री. प्रथमेश मोहोड यांची भेट घेवून नवमतदार नोंदणी बाबत माहिती जाणून घेतली. श्री. मोहोड यांनी नवमतदार नोंदणीसंबधी ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी कशापद्धतीने करायची याबाबत माहिती दिलीत. १ जानेवारी २०२२ या अहर्ता दिनांकावर वय वर्ष १८ पूर्ण करणाऱ्या अधिकाधिक पात्र नागरिकांनी मतदार म्हणून आपली नाव नोंदवावी. नवीन मतदार नोंदणी करिता आवश्यक कागदपत्रे मध्ये पासपोर्ट फोटो, ओळखपत्रामध्ये पॅनकार्ड, जन्माचा दाखला, ड्रायविंग लायसन्स या पैकी एक, रहिवासी पुराव्यामध्ये राशन कार्ड, वीजबिल, मालमत्ता कर पावती, बँक पासबुक, पाणीपट्टी पावती यापैकी एक चालेल. तसेच नवीन नाव समाविष्ट करण्याकरिता नमुना अर्ज क्रमांक ६ वापरावा आणि एका मतदार संघातून दुसऱ्या मतदार संघात स्थलांतर झाल्यास नाव समाविष्ट करण्याकरिता नमुना अर्ज क्रमांक ८ अ तर मतदार यादीतील तपशिलामध्ये दुरुस्ती करण्याकरिता नमुना क्रमांक ८ वापरा, मतदार यादीतील नाव वगळण्याकरिता, मतदार नोंदीबाबत आक्षेप घेण्याकरिता एकाच मतदार संघातून एका यादीतून दुसऱ्या यादीत स्थलांतर झाल्यास पत्ता बदल कार्यकरिता नमुना अर्ज क्रमांक ७ चा उपयोग करावा तर ऑनलाईन मतदार नोंदणी करीता ,राष्ट्रीय मतदाता पोर्टलवर, व्होटर पोर्टर आणि व्होटर हेल्पलाईन ऍप वर जाणून सुद्धा नोंदणी करता येते. तालुक्यातील मतदान केंद्रात, मतदान नोंदणी अधिकारी, सहाय्यक नोंदणी अधिकारी तथा तहसिदार कार्यालयात अर्ज करण्याची सोय आहे तसेच २७ व २८ नोव्हेंबर २०२१ ला सर्व मतदार केंद्रावर विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती नायब तहसिदार श्री. मोहोड यांनी दिली.
अठरा वर्षाचा किंवा त्या पेक्षा जास्त वयाच्या कुठल्याही भारतीय नागरिकाने मतदान नोंदणी करणे गरजेचे असून नोंदणी केल्यानंतरही आपले मतदानाचे पवित्र कार्य पार पाडून देशातील लोकशाही बळकट करावीत असे आवाहन प्राचार्य डॉ. रामटेके यांच्यातर्फे करण्यात आले. मतदार यादीत नाव नोंदणी साठी विद्यार्थ्यांना नाव नोंदणी च्या ऑनलाईन प्रक्रियेविषयी संकेत स्थळ आणि राष्ट्रीय मतदाता पोर्टल (NVSP) विषयी भेट देवून आवश्यक कागद पत्रे अपलोड करावी. ऑफलाईन मतदार नोंदणी अर्ज रासेयो विभागात उपलब्ध असून ज्यांना ऑनलाईन नोंदणी करण्याची मदत हवी असेल त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी यांच्याशी संपर्क करावा. यावेळी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. मंगेश अडगोकर, रासेयो, कार्यक्रम अधिकारी, प्रा. डॉ. प्रफुल्ल चौधरी, रासेयो, सहकार्यक्रम अधिकारी,प्रा. डॉ. युगंधरा गुल्हाने, रासेयो, महिला कार्यक्रम अधिकारी, प्रा. डॉ. प्रशांत सातपुते, तसेच तहसील कार्यालयाचे कर्मचारी कु. कीर्ती विलायतकर, श्री. प्रतीक वानखडे आणि श्री. विजय पोटे प्रामुख्याने उपस्थित होते.