- *12 कोटींहून अधिक रकमेची तडजोड
अमरावती : न्यायालयीन प्रकरणांत सामोपचाराने आपआपसातील वाद, तंटे मिटावेत या उद्देशाने जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणातर्फे जिल्हा व सत्र न्यायालयासह जिल्ह्यातील विविध न्यायालयांत आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत तब्बल 4 हजार 861 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.
जिल्हा व सत्र न्यायालय, तसेच विविध न्यायालयांत गत शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, दिवाणी व फौजदारी प्रकरणे, बँकेची प्रलंबित प्रकरणे, चेक न वटल्याची प्रकरणे (निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट), भूसंपादन प्रकरणे, विवाहासंबंधी कायद्याचे दावे, बँकेची, तसेच दिवाणी आणि फौजदारी अपील व इतर दिवाणी प्रकरणे संबंधित दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी लोकअदालतीसमक्ष ठेवण्यात आली होती. अशा विविध 4 हजार 861 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष रवींद्र एम. जोशी, तसेच जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश जी. आर. पाटील, तसेच विविध न्यायाधीश वर्गाच्या मार्गदर्शनानुसार ही लोकअदालत यशस्वी झाली.
- लोकअदालतीसाठी 40 पॅनलची निर्मिती
लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आलेल्या प्रकरणांची पूर्तता करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात एकूण 40 मंडळांची (पॅनल) निर्मिती करण्यात आली होती. न्यायाधीश, अधिवक्ता गण, न्यायालयीन कर्मचारी यांचा त्यात समावेश होता. लोकअदालतीत प्रकरणे आपापसात तडजोडीने व सामंजस्यपूर्वक मिटत असल्याने मानसिक ताण दूर होण्याबरोबरच पैसा व वेळ वाचतो, तसेच आपापसातील मतभेद दूर होण्यास मदत होते. त्याबाबत आवाहन करण्यात आल्याने पक्षकारांकडून मोठा सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
- 12 कोटींहून अधिक तडजोडीच्या रकमेच्या प्रकरणांचा निपटारा
संपूर्ण जिल्ह्यात लोकअदालतीत 28 हजार 706 दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 3 हजार 209 प्रकरणांचा, तर प्रलंबित 9 हजार 311 प्रकरणांपैकी 1 हजार 652 प्रकरणांचा अशा एकूण 4 हजार 861 प्रकरणांचा यशस्वीरित्या निपटारा झाला. राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून 12 कोटी 28 लाख 21 हजार 832 रूपये तडजोडीच्या रकमेच्या प्रकरणांचा न्यायनिवाडा झाला.
तीन दिवसांची विशेष मोहिमही घेतली
दरम्यान, मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे दि. 8 ते 10 डिसेंबर दरम्यान स्पेशल ड्राईव्ह अर्थात विशेष मोहिम घेण्यात आली. या मोहिमेतही 1 हजार 886 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.
लोकअदालत यशस्वी होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश, पॅनलवरील न्यायाधीश, वकिल, पॅनल सदस्य व सर्व विधिज्ञ यांनी जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले. लोकअदालतीला विविध पोलीस अधिकारी, पोलीस नाईक अरूण हटवार यांचे महत्वपूर्ण सहकार्य लाभले.