गावात सलोखा निर्माण करण्याचे आवाहन
अमरावती : दानापूर गावात ग्रामस्थ बांधवांनी एकोपा व सलोखा निर्माण करावा, असे आवाहन राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी आज केले. या घटनेबाबत प्रशासनाने सर्व प्रक्रिया तत्काळ पूर्ण करून संबंधितांना न्याय मिळवून द्यावा. दोषींवर कारवाई व्हावी व गावात सलोखा निर्माण करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.
चांदूर रेल्वे तालुक्यातील दानापूर या गावी भेट देऊन श्री. पारधी यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी घटनास्थळी भेट देऊन अत्याचारपिडितांशी संवाद साधून त्यांची व्यथा जाणून घेतली. यावेळी त्यांनी ग्रामस्थ बांधवांनी सलोख्याने राहण्याचे आवाहन केले. पिडितांना नियमानुसार सर्वतोपरी मदत मिळवून देऊ, असेही ते यावेळी म्हणाले.
प्रशासनासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
दानापूर येथील भेटीनंतर अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य श्री. पारधी यांनी प्रशासनाची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन प्रशासनाकडून झालेल्या कार्यवाहीची माहिती घेतली. विभागीय आयुक्त पीयुष सिंह, जिल्हाधिकारी पवनीत कौर, विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना, जिल्हा पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ, उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, समाजकल्याण उपायुक्त सुनील वारे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. याप्रकरणी पिडीतांना तत्काळ मदत मिळवून द्यावी व चौकशी प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, असे आदेश श्री. पारधी यांनी दिले.
दानापूर गावात सामाजिक सलोखा निर्माण होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने प्रयत्न करावे. पिडीतांना न्याय मिळवून द्यावा. सामाजिक तेढ निर्माण करणा-यांवर कडक कारवाई करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. या बैठकीनंतर श्री. पारधी यांनी पत्रकार बांधवांशीही संवाद साधला.
डिसेंबरमध्ये पुन्हा आढावा घेणार
आयोगाचे सदस्य श्री. पारधी म्हणाले की, या घटनेबाबत दानापूर येथे जाऊन पिडित कुटुंब, तसेच गावकरी बांधवांशी संवाद साधला आहे. प्रशासनाने आतापर्यंत केलेल्या प्रक्रियेचा आढावा घेतला आहे. प्रशासनाकडून रस्त्याबाबत आलेल्या अर्जावर चार सुनावण्या झाल्या. त्यापैकी दोन सुनावण्यांना दोन्ही पक्ष उपस्थित होते. याविषयी लिखित जबाबाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
दानापूर येथे सोयाबीन गंजी जाळल्याच्या तक्रारीनुसार याठिकाणी आपण जाऊन घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. पोलीसांकडून दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे, तसेच त्याची चौकशी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्याबाबत समाजकल्याण विभागांतर्गत पिडितांना २ लाख रूपये अर्थसाह्य मंजूर करण्यात आले. त्याचा प्रथम हप्ता ५० हजार रूपये अदा करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रक्रियेचा आढावा आपण स्वत: डिसेंबरमध्ये घेणार आहोत, असे श्री. पारधी यांनी यावेळी सांगितले.