मुंबई : सध्या राज्याची घडी एवढी विस्कटलेली आहे, की ती कशी सावरायची हे समजत नसल्याने राज्य सरकार अधिवेशनापासून दूर पळतं आहे. अधिवेशन होऊ नये, झाले तर कमीत कमी दिवस व्हावे. त्याही दरम्यान कुठलीही चर्चा होऊ नये. अशा प्रकारची रणनीती या सरकारने बनवली आहे. अशी टीका विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पत्रकारपरिषेदतून केली.
तसेच, राज्याचे तथाकथित अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सोमवरी सुरू होतं आहे. मी तथाकथित यासाठी म्हटले की, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या इतिहासातील सगळ्यात लहान व पूर्णपणे कामकाजापासून पळ काढणारे अधिवेशन हे सोमवारपासून सुरू होत आहे. असे देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवले.
या पत्रकारपरिषदेत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची देखील उपस्थिती आहे. खरं म्हणजे या सरकारची अवस्था अशी आहे की, तीन पाटाचे सरकार आहे. कोण कोणत्या पाटावर बसले आहे, कोण कोणाचा पाट ओढतो आहे, हे लक्षात येत नाही. अशा प्रकारची सरकारची अवस्था आहे. एकमेव काम या सरकारमध्ये सुरू आहे ते म्हणजे बदल्या आणि बदल्याच्या बोल्या लागत आहेत.
प्रचंड मोठा भ्रष्टाचार बदल्यांच्या माध्यमातून या सरकारमध्ये होताना दिसतो आहे. दुर्देवाने महाराष्ट्रात जे कधीच घडत नव्हते. आयएएस व आयपीएसच्या बदल्यांमध्ये देखील भ्रष्टाचार हा मोठय़ा प्रमाणावर या सरकारमध्ये होताना दिसतो आहे. असा आरोप देखील फडणवीस यांनी यावेळी केला.
शेतकर्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे आणि हा विषय आम्ही निश्चतपणे लावून धरणार आहोत. बांधावर जाऊन केलेल्या घोषणा विरल्या, शेतकरी वाट पाहून थकले. आता तर ते बांधही थकले. परंतु शेतकर्यांना कुठलीही मदत मिळालेली नाही.
एवढंच नाही तर शेतमलाची खरेदी देखील या सरकारने कुठेही केलेली पाहायला मिळत नाही. अशातच शेतकरी असो की सामन्य माणूस या सर्वांवर वीज बिलाचे एक मोठं संकट या सरकारने लादले आहे. असेही फडणवीस म्हणाले आहेत.