मुंबई : राज्यात कोरोनाच्या नव्या प्रकाराचे सध्या आठ रुग्ण असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरु असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. नव्या प्रकाराची लागण झालेल्यांच्या संपर्कात आलेल्यांपैकी कोणी पॉझिटिव्ह नसल्याची दिलासादायक माहितीही यावेळी त्यांनी दिली. आयसीएमआरच्या प्रोटोकॉलचे आपण सक्तीने पालन करत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितलं. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यात ८ जानेवारीला सर्व जिल्ह्यांमध्ये लसीकरणाची ड्राय रन होणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. राजेश टोपे यांनी यावेळी जनतेने जागरुक राहावे, घाबरण्याचे कारण नाही. चिंता करु नका पण काळजी घ्या असे आवाहन केले. व्हायरसचा हा नवा प्रकार जास्त संसर्गजन्य आहे. ७0 टक्के अधिक झपाट्याने संसर्ग होऊ शकतो. काळजी घ्यावी, सजग राहावं इतकंच महत्वाचं आहे, असे त्यांनी सांगितलं.
राज्यात सध्या आठच रुग्ण असून त्यांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम सुरु आहे. त्यांच्या संपर्कातील कोणीही पॉझिटिव्ह आढळलेला नाही. कोणी पॉझिटिव्ह आढळला तरी कोरोनाच्या नव्या प्रकाराचा संसर्ग झालाय का हे आधी तपासावे लागेल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. ७ जानेवारीला केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसोबत आमची व्हिडीओ कॉन्फरन्सिंग होणार असून अनेक मुद्दे मांडणार आहेत.
Related Stories
September 17, 2024
September 14, 2024