पिंपरी : राज्यात कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी वाढत आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी एमपीएससी समन्वय समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
राज्य लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) येत्या ११ एप्रिलला संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. एमपीएससीची तयारी करणार्या अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. परीक्षेची तयारी करणार्या दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये दोन गट पडले आहेत.
समन्वय समितीने गेल्या आठवड्यात परिक्षार्थींचे मत आजमावले. टेलीग्रामवर मतही आजमविण्यात आले. यात सहभागी आठ हजार विद्यार्थ्यांपैकी ५१ टक्के जणांनी परीक्षा घेण्याच्या बाजूने मत दिले होते. मात्र जसजशी बधितांची संख्या वाढत आहे, तसतशी परीक्षा पुढे ढकलण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे.
राज्यासह देशभरात कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. एमपीएससी परीक्षेची तयारी करणार्या दोघा विद्यार्थ्यांना प्राणास मुकावे लागले आहे. पुण्यात अभ्यास करणारे अनेक विद्यार्थी कोरोना लक्षणे असलेल्या व्यक्तिंच्या संपर्कात आले आहेत. काहींना कोरोनाची बाधा झाली आहे. तर काही जण परीक्षेनंतर रुग्णालयात जाऊ असा विचार करीत आहेत. मध्यप्रदेश आणि बिहारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.
राज्यातील बधितांची संख्या लक्षात घेता सरकारने आपला निर्णय जाहीर करवा. त्या नुसार विद्यार्थ्यांना पुढील नियोजन करता येईल, अशी विनंती एमपीएससी समन्वय समितीचे राहुल कवठेकर, महेश घरबुडे, अरुण पाटील आणि विश्वंभर भोपळे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.