मुंबई : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यात स्वबळावर पक्ष सत्तेत आणणार, असे सांगत सूचक विधान केले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी सांगितले की, आमच्या पक्षात जे काही संघटनात्मक निर्णय घेण्याचे अधिकार आहेत ते राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना आहेत. जी जबाबदारी मिळेल ती प्रामाणिकपणे पार पाडून पक्ष बळकट करण्यासाठी आणि पक्ष स्वबळावर महाराष्ट्रात सत्तेत कसा येईल यासाठी प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्राला पुन्हा वैभव मिळवून देण्याचे काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केले जाईल.
काँग्रेसमध्ये लवकरच मोठे बदल होण्याची शक्यता असून बाळासाहेब थोरात यांच्या जागी नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड अंतिम मानली जात आहे. बाळासाहेब थोरात यांच्यावर एकाच वेळी अनेक जबाबदार्या असल्याने त्यांच्यावरी भार कमी करण्याच्या हेतूने प्रदेशाध्यक्ष दुसर्या नेत्याकडे सोपवले जात असल्याचे सांगितले जात आहे. बाळासाहेब थोरात यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना तसे संकेतही दिले होते. दरम्यान ,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निवडीच्या चर्चेत नाना पटोले यांचे नाव आघाडीवर आहे. याबाबत त्यांनी सूचक विधानही केलें आहे. मात्र प्रदेशाध्यक्ष होण्यापूर्वीच त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत खळबळ माजली आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित येऊन राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. सरकार भक्कम असून पुढील निवडणुकांमध्येही तिन्ही पक्ष एकत्र असतील असे वारंवार तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. नाना पटोले पाडळे लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित शेतकर्यांना मोबदला देण्यासाठी ठाणे जिल्ह्य़ातील मुरबाड तालुक्यात आले होते.
Related Stories
December 4, 2023
December 4, 2023