अमरावती : चांदूर बाजार तालुक्यातील राजुरा गावाजवळील राजुरा नाल्यावरील लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या कामासाठी 193 कोटी 81 लाख रूपये किंमतीला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली असून, या कामाला लवकरच गती मिळेल, असा विश्वास जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज व्यक्त केला.
राजुरा बृहत लघु पाटबंधारे प्रकल्पामध्ये बेलोरा गावाजवळ संधानकातील वळण बंधारा बांधून त्यातून फीडर कालव्याद्वारे राजुरा बृहत लघुपाटबंधारे धरणात पाणी आणणे व या धरणातून उजव्या कालव्याद्वारे सिंचन करण्याचे नियोजन आहे. ही खारपाणपट्ट्यातील योजना असून, हजारो हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ मिळून कृषी उत्पादकता वाढण्यास मदत होणार आहे. खारपाणपट्ट्यातील शेतकरी बांधवांसाठी हा प्रकल्प लाभदायी ठरेल, असा विश्वास राज्यमंत्री श्री. कडू यांनी व्यक्त केला.
या प्रकल्पाची साठवण क्षमता 5.989 दलघमी इतकी असून, उपयुक्त पाणीसाठा 5.496 दलघमी आहे. या प्रकल्पाद्वारे खारपाणपट्ट्यातील सहा गावांतील हजारो हेक्टर शेती क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. प्रकल्पासाठी आवश्यक 359.05 हेक्टरपैकी 58.84 हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आले आहे.
प्रकल्पाला निधी उपलब्ध झाल्यानंतर महामंडळाने उर्वरित भूसंपादनासाठी निश्चित कालावधी ठरवून त्या विहित मुदतीत उर्वरित भूसंपादन पूर्ण करण्याची प्रक्रिया प्राथम्याने पूर्ण करावी. आवश्यक मान्यता वेळेत मिळवाव्यात. प्रकल्पावर लाभधारकांची पाणी वापर संस्था स्थापन करण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.