- नियोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा
- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त (26 जून) छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेतर्फे (सारथी) अमरावती विभागीय स्तरावर कौशल्य विकास जनजागृती मेळावा, रक्तदान शिबिर आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व विभाग, संस्था, संघटनांच्या समन्वयाने हा कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासन व ‘सारथी’तर्फे करण्यात आले आहे.
राज्यातील आठ विभागीय ठिकाणी ‘सारथी’तर्फे दि. 26 जून रोजी विविध कार्यक्रम होणार आहेत. त्यानुषंगाने अमरावती येथील कार्यक्रमाच्या पूर्वतयारीबाबत बैठक निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांच्या दालनात झाली. ‘सारथी’चे वरिष्ठ प्रकल्प संचालक (सामाजिक न्याय) डी. डी. देशमुख, उपजिल्हाधिकारी रणजीत भोसले, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार अधिकारी प्रफुल्ल शेळके, अधिक्षक उमेश खोडके, मराठा सेवा संघाचे अरविंद गावंडे, अश्विन चौधरी, नरेशचंद्र काठोळे, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे आदी उपस्थित होते.
वरिष्ठ प्रकल्प संचालक श्री. देशमुख म्हणाले की, सारथी ही संस्था मराठा, कुणबी, कुणबी- मराठा, मराठा- कुणबी या लक्षित गटाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी कार्यरत आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त यावर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, सारथी यांच्यामार्फत कार्यक्रम आयोजिण्यात आले आहेत. राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजनभवनात दि. 26 जूनला सकाळी 11 वाजता सारथी कौशल्य विकास जनजागृती मेळावा होणार आहे. या मेळाव्याद्वारे होतकरू युवक-युवतींना रोजगारविषयक संधी आदी माहितीसह कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येईल.
त्याचप्रमाणे, यादिवशी जिल्ह्यातील सामाजिक संघटना, विविध विभागांच्या सहकार्याने रक्तगट तपासणी व रक्तदान शिबिरही नियोजनभवनात सकाळी 9 वाजतापासून आयोजिण्यात आले आहे. या शिबिरात विविध मान्यवर, अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, तरूण आदींचा अधिकाधिक सहभाग मिळविण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमांच्या पूर्वतयारीबाबत सविस्तर चर्चा यावेळी झाली. सर्व विभागांनी विविध संस्था, संघटनांचे सहकार्य मिळवून व समन्वय ठेवून हे उपक्रम यशस्वी करावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी श्री. बिजवल यांनी केले.