गच्च भरल शेंगान
मारे ऊफायन्या मूंग
आस रंनावल रान !!
बोंडया फुलान सजली
लेक माही रे पर्हाटी
गच्च हिरवी अम्बाडी
कसी दिसे तरणिताठी !!
अंगा हळद माखली
तूर आली जवानीत
मक्का बांधून बाशिंग
ऊभा घेऊन वरात !!
भडमुंजा भड बाई
ऊभा तुरीच्या वईत
कव्वी लचक चवळी
कसा घेई ग कवेत !!
निळ्या,ढवळ्या टोपित
ऊभा बांधावर तीळ
मठ मटक शेंगिले
कसा घालतोया शिळ !!
भुईशेंग ती लाजरी
कशी लपली मातीत
भेंडी,अम्बाडी,गवार
पिंगा घालती रानात !!
टच्च भरल कनिस
कस डोले वाऱ्यावर
डोळा चूकोनी होऱ्याचा
दाना टिपति पाखर !!
आस फूलल फुलल
सार शिवार खुलल
दिसे हिरव हिरव
आस रान रंनावल !!
– वासुदेव महादेवराव खोपडे
सहा पोलीस उपनिरीक्षक (सेनी)
अकोला 9923488556