अमरावती : युवकांत देशप्रेमाची भावना दृढ करणे व अभिव्यक्ती कौशल्याला वाव मिळण्यासाठी केंद्रीय युवक कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, तसेच नेहरू युवा केंद्रातर्फे आयोजित वक्तृत्व स्पर्धेत 18 ते 29 वर्षे वयोगटातील युवकांना सहभाग मिळू शकेल. इच्छुकांनी नेहरू युवा केंद्राच्या कार्यालयात नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा युवा अधिकारी स्नेहल बासुतकर यांनी केले.
स्पर्धेतील गुणवंतांना राष्ट्रीय पातळीवर 2 लाख, 1 लाख व 50 हजार, तसेच राज्य पातळीवर 25 हजार, 10 हजार व 5 हजार, त्याचप्रमाणे, जिल्हा पातळीवर 5 हजार, 2 हजार व 1 हजार अशी अनुक्रमे तीन बक्षीसे प्रमाणपत्रांसह मिळणार आहेत. जिल्ह्यातील प्रथम गुणवंतास राज्य स्पर्धेत प्रवेश मिळेल.
स्पर्धकाला सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास या विषयासह देशभक्ती व राष्ट्रउभारणी या विषयावर हिंदी किंवा इंग्रजीत पाच मिनीटे मनोगत व्यक्त करावयाचे आहे. ही स्पर्धा तालुकास्तरावर होईल व स्पर्धेत यापूर्वी गत पाच वर्षांत बक्षीस मिळवलेल्या स्पर्धकांना सहभाग मिळणार नाही.
इच्छूकांनी आधारकार्डची झेरॉक्स प्रत व पासपोर्ट साईज छायाचित्रासह नेहरू युवा केंद्राच्या कार्यालयात नोंदणी करण्याचे आवाहन श्रीमती बासुतकर यांनी केले. हे कार्यालय कॅम्पमधील बियाणी चौकात आहे.
—–