यवतमाळ : कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे रेंगाळलेल्या बदल्यांना मंगळवार, पासून सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी कर्मचार्यांनी प्रचंड गर्दी केली. प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन कर्मचार्यांनी केले. या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे स्पष्ट दिसून आले. असे असले तरी सामान्य प्रशासन विभागातील विविध संवर्गाच्या ५९, बांधकाम ६, महिला व बाल कल्याणमधील महिला पर्यवेक्षक चार आणि सिंचन विभागातील एका शाखा अभियंत्यांची बदली झाली.
साधारणत: दरवर्षी जिल्हा परिषद कर्मचार्यांच्या मे महिन्यात बदल्या होतात. यंदा मे महिन्यात सर्वच जण कोरोनाच्या दुसर्या लाटेला तोंड देत होते.शेवटी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने १५ टक्के बदल्या करण्यास हिरवी झेंडी दाखविली. तसेच संपूर्ण बदल्या ३१ जुलै पूर्वी कराव्या, असे निर्देश दिले होते. अशात मंगळवार, दि. २७ जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभागृहात बदल्यांना सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी बदली पात्र कर्मचार्यांसह इतरही संघटनेच्या कर्मचार्यांनी गर्दी केली. एकूण ५९ कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यासोबतच महिला व बाल कल्याणच्या ४ महिला पर्यवेक्षक, बांधकाम ६, सिंचनमधील एक शाखा अभियंत्याची बदली झाली. समुपदेशनातून बदल्या करण्यात आल्याने अनेकांची सोय झाली.