- कडकडाट विद्युल्लतेचा
- थाट अंबरात इंद्रधनुचा
- गोफ विणला सप्तरंगी
- नाद कान्हाच्या वेणुचा
खरेच! पावसाळा ऋतू लहानथोर साऱ्यांचाच आवडता ऋतू. रिमझिम पावसात नाचायला नि भिजायला कोणाला आवडत नाही! पावसाळ्याचे हे दिवस! मनमयूर मोरपंख फुलवून डोलतोय.मनही रिमझिम पावसांत ओलावलेय. कळतच नाही मेघ नभांत दाटलेत की डोळ्यांत ! आता कोणत्याही क्षणी धारा झरझरू लागणार! असे वाटताच मन भूतकाळात गेले. किती सुंदर दिवस ! किती सुखाचा क्षण! दिवस पावसाळ्यातला! मेघ दाटून आलेले.काळाकुट्ट तो अंधार ! मध्येच विजेचा तडाखा! किती मनोहारी दृश्य! तरुणाईला घराबाहेर पडण्याचा मोह होणार नाही तर नवलच! दर्या-कपार्या तून खळाळणारे धबधबे! स्वर्ग याहून काय निराळा असेल!
- मेघ दाटलेत अंबरी
- वाही सळसळ वारा
- घेऊन जातो पर्जन्या
- टपटप बरसती गारा
.
सखीचा हात हातात घेऊन धबधब्यातील जलतुषार अंगावर झेलत नभामधले सप्तरंगी इंद्रधनु पहात स्वैर हिंडण्यातली मजा काही औरच ! हातातील भाजलेले मक्याचे कणीस खात त्या रम्य वातावरणात भटकण्याची संधी म्हणजे पावसाळ्यातली पर्वणीच ! अशीच एक मेघाच्छादित रम्य सायंकाळ! पाऊस रिमझिम करता करता कधी मुसळधार कोसळू लागतो हेही ध्यानात येत नाही. कारण तोही आपल्या सारखाच अवखळ! आपणास भिजवण्याची एकही संधी तो सोडत नाही. तरुणींच्या बटांना वाऱ्यावर खेळविण्यात त्याचा हातखंडा! आणि हे काय त्यांची ओढणीही खेचतोय खट्याळ! जणू ती तरुणी त्याला जाब विचारते,
- असा कसा रे पावसा
- तू खट्याळ नि नाठाळ
- उडवतो माझ्या बटांना
- वात्रट आणि खोडसाळ
तिला त्याचीही गंमत करावीशी वाटते. जलधारा मूठीत पकडून ती त्यालाच भिजवायला जाते. परंतु पाऊस दडीच मारून बसतो.असा आभासी पाऊस आपणा सर्वांचाच लाडका सखाच जणू! घननीळ नभांतून ओघडताना तो किती मनोहारी वाटतो! त्याचा एकेक टपोरा थेंब आपण अंगावर घेताना काया अशी शहारून उठते! असे वाटते जणू आपला सखाच आपणास मऊ हाताने कुरवाळत आहे नि आपणही डोळे गच्च मिटून घेतो. त्याचा सहवास मिटल्या डोळ्यांनी टिपत असतो. हवाहवासा त्याचा स्पर्श अनुभवतो. हातातील छत्रीही उडून गेलेल्याचेही भान राहत नाही. मनमयूर सप्तरंगी रंगात डोलू लागतो.
- असा येतो पाऊस वारा
- टपोऱ्याच या जलधारा
- मूठीत त्या घेऊ पाहता
- घेऊन जातो वात्रट वारा
पावसाच्या सरी अंगावर घेत विविध रंगी पिसारा फुलवून मोर थुईथुई नाचू लागतो. दूरवरून कोकीळ कुहू कुहू करून कोकिळेला बोलावतो. चातक आपली तहान भागवून आकाशात उंच गिरकी घेतो. पावश्यापक्षी मानवाचा मित्रच! ‘पेरते व्हा’ असा सल्ला देत बीजपेरणीसाठी आपणास सूचित करत असतो. इवलीशी पाखरे, पिले घरट्यातून इवल्याशा डोळ्यात पाऊस साठवत किलबिलत असतात.
‘तन डोले मेरा तन डोले’ अशीच अवस्था सार्या सजीव जगतात झालेली असते. चराचरात चैतन्य पसरते. दऱ्या खोऱ्यातून खळाळत फेसाळणारे झरे ओहळ नि धबधबे यांना फुलवत राहतात. डोंगरावर तृणाची हिरवळ पसरते.जलधारांचा कातळालाही जणू छिद्र पाडून प्रवाहित होतात. झुळझुळणारे झरे मधुर जलाचा प्रवाह घेऊन नदीपर्यंत वहायला लागतात. जणू नदीला सांगतात बघ तुझे नि सागराचे मिलन करण्यात आमचाही वाटा आहे.वळव तुझा प्रवाह! आम्ही येऊन तुला मिळतो. लाग सागराच्या वाटेला!पावसामुळे साऱ्या निसर्गात चैतन्य उभारते. मेघांच्या या दाट अंबरात आपण आपल्या सख्याचा माग धुंडाळत राहतो पुन्हा पुन्हा……..!
- सौ.भारती सावंत
- मुंबई
- 9653445835
(Images Credit : Shabdraj)