यवतमाळ : जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत मार्च महिन्यात मृत्युचा आकडा चार पटीने वाढला आहे. शिवाय कोरोनाबाधित रुग्णांची संख्यासुध्दा दिवसेंदिवस वाढतच आहे. ही अतिशय गंभीर बाब असून जिल्ह्याचा मृत्यु व पॉझिटीव्हीटी दर कमी करण्यासाठी गांभियार्ने टेस्टिंग करा, असे निर्देश विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोव्हीड परिस्थितीचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार आदी उपस्थित होते. वैद्यकीय महाविद्यालयात मृत्युचे प्रमाण वाढण्याचे कारण काय, अशी विचारणा करून श्री. सिंह म्हणाले, अमरावती विभागात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत यवतमाळमध्ये मृत्यु जास्त होत आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी राज्याच्या टास्क फोर्ससोबत नियमित संपर्क ठेवावा. मृत्यु होत असलेल्या यवतमाळ, दिग्रस, दारव्हा, पुसद, महागाव, वणी, केळापूर आदी भागात सर्व्हेलन्स, टेस्टिंग आणि प्रतिबंधित क्षेत्राची सीमा वाढवावी. तसेच खाजगी रुग्णालयात मृत्युचे ऑडीट झाले काय. त्यांनी शासनाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे कार्यप्रणाली राबविली की नाही, या बाबी तपासण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या.
१ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र जिल्ह्यात लसीकरणाची गती अतिशय कमी असल्याचे सांगून श्री. सिंह म्हणाले, पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्सचे १00 टक्के लसीकरण करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र महसूल, पोलिस, जिल्हा परिषद, नगर पालिका प्रशासन, पंचायत राज व्यवस्था आदी विभागांचे केवळ ८५ टक्केच उद्दिष्ट पूर्ण झाले. लसीकरणाची गती वाढविली नाही तर पाहिजे त्या प्रमाणात पुरवठा होणार नाही. लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी, न.प. मुख्याधिकारी यांच्यासह संपूर्ण यंत्रणेला कामाला लावा. गृहविलगीकरणात सद्यस्थितीत किती जण आहेत. यात ग्रामीण व शहरी भागातील रुग्ण किती. तसेच त्यांच्यावर कोणाची देखरेख आहे, आदी प्रश्नाबाबत त्यांनी जाब विचारला. गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णाच्या घरासमोर फलक लावायचा असून संबंधित रुग्णाच्या हातावर शिक्का मारायचा आहे. तसेच आरोग्य कर्मचा-यामार्फत रोज घरी भेट देऊन त्याच्या तापाची व ऑक्सीजन स्तरची नोंद घ्यायची आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी असून लक्षणे नसलेल्या नागरिकांना तेथे न ठेवता कोव्हीड केअर सेंटरमध्ये स्थलांतरीत करावे. प्रतिबंधित क्षेत्राबाबात बोलतांना ते म्हणाले, प्रतिबंधित क्षेत्रामधील प्रत्येक घराचा सर्व्हे होणे आवश्यक आहे. सोबतच घरातील प्रत्येक व्यक्तिची टेस्टिंग करावी. प्रतिबंधित क्षेत्राची सीमा निश्चित करून यातील घरांची संख्या वाढवा. केंद्र व राज्य शासनाच्या लेखी सुचनांप्रमाणे कार्यप्रणाली राबविणे बंधनकारक आहे. जोपयर्ंत जिल्ह्याचा मृत्युदर कमी होत नाही व पॉझिटीव्हीटी दर पाचच्या खाली येत नाही, तोपयर्ंत नियमितपणे टेस्टिंग झाल्याच पाहिजे. तालुकानिहाय टेस्टिंगचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. यात थोडी जरी कमतरता आली तर पॉझिटीव्हीटी दर वाढतो. असे विभागीय आयुक्त यांनी सांगितले. यावेळी सादरीकरण करतांना जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, टेस्टिंगसाठी आणखी दोन नवीन मशीन घेण्यात येत आहे. तशी ऑर्डर देण्यात आली असून या दोन मशीन कार्यान्वित झाल्या तर दररोज ३५00 ते ४000 टेस्टिंग होईल. तसेच पुढील २0 दिवसांत यवतमाळ शहरातील ४५ वर्षे वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी नवीन लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. बैठकीला जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. सुभाष ढोले, डॉ. पी.एस.चव्हाण, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज तगडपिल्लेवार आदी उपस्थित होते.