- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती जिल्ह्यातील फक्त मुलींसाठी असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत(शासकीय आयटीआय) सन 2022 च्या प्रवेशासाठी ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू असून प्रवेशाची अंतिम मुदत 23 जुलै 2022 पर्यंत आहे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून उत्तीर्ण होणाऱ्या अनेक प्रशिक्षणार्थींना नामाकिंत कंपनी, शासकीय-निमशासकीय आस्थापनेत रोजगार प्राप्त झाला आहे. तसेच काहींनी स्वतःचा उद्योग-व्यवसाय निर्माण करून स्वयंरोजगार निर्माण केला आहे. उद्योग क्षेत्रातील अनेक नामांकित आस्थापनेचे प्रतिनिधी दरवर्षी या संस्थेत येवून येथे शिकत असलेल्या प्रशिक्षणार्थींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत असतात.येथे विविध कौशल्यावर आधारित व्यवसाय अभ्यासक्रम राबविले जातात. प्रशिक्षणासोबतच विद्यार्थिंनींच्या सर्वांगिण विकासासाठी संस्थेत अनेक उपक्रम राबविले जातात. उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, व्याख्याने व विविध विषयावरील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
या संस्थेमध्ये या वर्षी अभियांत्रिकी व बिगर अभियांत्रिकी स्वरूपाच्या एकूण 13 व्यवसायांमध्ये 456 जागेवर उमेदवारांना प्रवेश घेता येणार आहे. एक वर्ष कालावधीच्या व्यवसायामध्ये फॅशन टेक्नॉलॉजी, ड्रेस मेकिंग, कॉस्मेटॉलॉजी, फ्रुट अॅन्ड व्हेजिटेबल प्रोसेसिंग, कॉम्प्युटर ऑपरेटर अॅन्ड प्रोग्रामिंग असिस्टंट (कोपा), मल्टिमीडिया अॅनिमेशन स्पेशल इफेक्ट, इंटेरिअर डेकोरेशन डिझायनिंग, बेकर अॅन्ड कन्फेक्शनर, फुड प्रॉडक्शन आणि सरफेस ऑरनॉमेंटेशन टेक्निक हे ट्रेंड उपलब्ध आहेत. दोन वर्ष कालावधीच्या व्यवसायामध्ये इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, आय.सि.टी.एस.एम. आणि ड्रॉप्समन मेकॅनिकल हे ट्रेंड प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. प्रवेशासाठी वयाची अट नसून राज्य, जिल्हा, तालुका असे बंधन नाही. इतर राज्य व जिल्ह्यातील महिला उमेदवारही प्रवेशासाठी अर्ज करू शकतात.
संस्थेमध्ये मुलींच्या राहण्यासाठी वसतिगृहाची सोय आहे. शासनाची शिष्यवृत्ती, विद्यावेतन, निर्वाहभत्ता, बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना एस. टी. बस प्रवास सवलत या सारख्या विविध योजनांचा लाभही मिळतो. येथील प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शिकाऊ उमेदवारी योजनेची (अॅप्रेंटीशिप) संधी, शासकीय, निमशासकीय किंवा खाजगी आस्थापनेमध्ये रोजगाराची संधी, उच्च शिक्षण घेवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना पदविका अभ्यासक्रमामध्ये थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेशाची संधी उपलब्ध आहे.
आयटीआय मधील प्रवेश हे इयत्ता दहावीच्या गुणपत्रिकेतील गुणांच्या आधारे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रणालीव्दारे करण्यात येणार असून अर्ज कोणत्याही ऑनलाईन माध्यमातून भरता येईल. एका मोबाईल क्रमांकावर केवळ एकच अर्ज भरता येईल. ऑनलाईन अर्जात प्राथमिक माहिती भरल्यानंतर उमेदवाराचे प्रवेश खाते तयार होईल. उमेदवाराने त्याच्या प्रवेश खात्यात लॉगइन करून संपूर्ण प्रवेश अर्ज भरुन शुल्क ऑनलाईन पेमेंट गेटवेच्या माध्यमातून जमा करावे. त्यानंतर प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी उमेदवाराने प्रवेश अर्जाची छापील प्रत व सर्व मुळ प्रमाणपत्रे आयटीआयमध्ये तपासणीसाठी सादर करावेत. मुळ प्रमाणपत्राची पडताळणी करून प्रवेश अर्ज निश्चित करणे आवश्यक आहे. प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी कोणतेही शुल्क देय नाही. अर्ज निश्चित केल्यावर उमेदवाराला प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य सादर करता येईल. माहितीपुस्तिका, प्रवेशाचे वेळापत्रक व आयटीआय प्रवेशासंबंधीची इतर संपूर्ण माहिती व प्रवेश अर्ज भरण्याची सुविधा https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.अधिक माहितीसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची), मोर्शी रोड, इर्विन चौक, अमरावती येथे संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य विवेक पडोळे यांनी केले आहे.