कवी अरूण विघ्ने यांनी त्याचा नुकताच प्रकाशित झालेला मी उजेडाच्या दिशेने निघालो हा कवितासंग्रह पाठविला.अत्यंत देखना व सुबक असा कवितासंग्रह नव्या मूल्यमंथनाचा सृजनशील आविष्कार आहे.वर्तमानात अंधार पेरणा-या कर्मठ मूलतत्ववाद्यावर उजेडाच्या प्रकाशअस्त्रांचा मारा करत आहेत. मी उजेडाच्या दिशेने निघालो हे शीर्षकच आशयगर्भ व मूल्यवर्धित आहे.तथागत गौतम बुद्ध, म.जोतिराव फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीतेजाची मशाल प्रकाशमान करून नवे उत्थानमूल्य समाजाला देत आहे याबद्दल कवीचे मनःपूर्वक अभिनंदन.
वर्तमान कोरोना विषाणूच्या महामारीने सारे क्षेत्र लयास गेले आहेत.मानवीय सभ्य समाजात असभ्यतेचे चित्र पाहायला मिळाले.समाजशील मानसाला चार भिंतीत बंदिस्त केले गेले.जगण्याच्या साऱ्या वाटा बंद केल्या गेल्या . साहित्य व शिक्षण क्षेत्र मानवाला नवी संजिवनी देतात .नवसृजनत्वाचा फुलोरा फुलवतात.या क्षेत्राला पंगू केले गेले.अशा अभावग्रस्त काळात कवीने तथागत बुध्दाची विज्ञानता, म. फुलेचे क्रांतीत्व, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची संविधानमूल्ये यांना डोक्यात घेऊन शब्दाची मशाल बनून गरीब, शोषित, पिडीत, शेतकरी, कामगार, बेरोजगार, विद्यार्थी यांच्या ज्वलंत भावमनाचे मनोविश्लेषणात्मक चित्रण आपल्या काव्यातून केले आहे. दुःख व दारिद्र वेदना झेलणाऱ्या मानसाला नवी ऊर्जा दिली.
काळोखाच्या गर्भातून नव्या सूर्याचा उदय करणारा हा कवितासंग्रह भग्न होत चाललेल्या अंधार वाटा प्रकाशमान करत चालला आहे.प्रमोद मुनघाटे आपल्या प्रतिक्रियेत लिहितात की,”आपला काळवंडलेला भुतकाळ आणि विषमतेच्या डंखाने सलणारा वर्तमानकाळ मागे टाकून हा कवी उजेडाकडे निघाला आहे.”ही सत्यता कवीच्या अंर्तमनात सदोदीत प्रज्वलीत होत आहे.
कविचे मन दुःख,दारिद्र ,गरीबी यांनी व्याकूळ होते.तो बंड करण्याची उर्मी जागृत करतो.रातकिड्यांच्या भूतकालिन काळी रात्र भेटून उजेडवाचाचे वैचारिक विहार बांधते.वर्तमानात लोकशाहीवर होणाऱ्या विटंबनेमुळे कवी बैचेन आहे.लोकशाहीच्या एकेका आक्सिजन तत्वांचा लिलाव तर होत नाही ना..! हा उपरोधात्मक व गंभीर प्रश्न तो उपस्थितीत करतो.कवीला कवितेतून मनोरंजन करायच नाही तर परिवर्तनशील क्रांतीजाणिवाचा माणूस तयार करायचा आहे.प्रस्तावनेत भूषण रामटेके लिहितात की,”या कवितेला आंबेडकरवादाचे बळ लाभले आहे.ही कविता क्रांती करायला उत्सुक झाली आहे.यासाठी मानवमुक्तीचा जाहिरणामा सोबत घेऊन ती उजेडाच्या दिशेने निघाली आहे.”हे मत कवीच्या कवितेची आशयगर्भ मांडणी विशद करते.
या कवितासंग्रहात एकूण ८३ कविता आहेत.या कवितेतून मानवतावादी विचाराची प्रेरणा मांडली आहे.अनेक कंगोऱ्यांनी युक्त ही कविता सामाजिक,राजकिय,धार्मिक,
वातावरणातील कार्याची वास्तविकता अधोरेखित करतेे.कवीचा हा चौथा कवितासंग्रह आहे.पक्षी,वादळातील दीपस्तंभ व जागल या कवितासंग्रहातील यशानंतर आलेला हा कवितासंग्रह कवीच्या सृजनत्व क्रियाची व्याप्ती पटवून देते.न्यूज चँनलवरील किंकाळणाऱ्या बेसूर ब्रेकिंग न्यूजने सामान्य माणूस कसा फसतो याचे भावचित्र”दररोज ब्रेकिंग न्यूज येत आहेत”या कवितेत लिहितात की,
- लोकशाहीच्या घराचे आधारस्तंभ एकीकडे झुकलेल दिसतात
- सत्तेच्या सारीपाटात प्रतिस्पर्ध्याच्या गोटातलं एकेक प्यादं
- हळूच बाद केलं जात आहे
- सारं कसं नियमाच्या चौकटीत राहूनच
- पण सर्व अनाकलनीय आहे
- सध्या तरी सारंच आलबेल आहे
- पण दररोज ब्रेकिंग न्यूज येत आहेत.
- पृ क्र ११५
ही कविता वर्तमानाचे दाहकतेचे विश्लेषण करते. हा कवितासंग्रह तथागत गौतम बुध्द्,महात्मा जोतीराव फुले,सावित्रीमाई फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा यांच्या अणुगर्भी ऊर्जेनं प्रभावित झालेला आहे.ही कविता देशातील शोषणकारी विषमतेवर आसूड ओढणारी आहे.काही कविता वऱ्हाडी भाषेत आल्या आहेत.दयन दयलं भीमाईनं, माया बापाले सांगजो, माय सुखाची सावली या कवितेतून नवी ऊर्जा वाचकाला मिळते.
- जातीभेदाले मायनं
- जवा जात्यात दयलं
- गानं संविधान गीत
- साखयदंडाले तोडलं..
- पृ क्र ३०
- माय पेटते अंदर
- रनरागिनीचं रूप
- तिच्या अगनीसमोर
- बाप इतयलं तूप…
- पृ क्र ९०
या कवितेमुळे कवितासंग्रहाला विशेष उंची प्राप्त झाली आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तुत्वाने हा देश प्रगतीपथावर चालत असला तरी अनेक माणसे त्याचे श्रेष्ठत्व मान्य करायला तयार नाही.बाबासाहेबांना जातीच्या चशम्यातून पाहणाऱ्या लोकांची सत्ता आल्याने ते अनेक कटकारस्थान करतात .कवीच्या रक्तातच भीमरसायन आहे म्हणून ते “प्रकाशपर्वाचा साक्षीदार “या कवितेत लिहितात की,
- मी जन्मलो तेव्हा
- विषमताच्छादित रात्रीच्या गर्भातून
- समतेचा नवा सूर्य उगवत होता
- मनुस्मृती जाळून भीमाने मला
- तथागत बुध्दाचा धम्म दिला होता
- पिढ्यान् पिढ्यांच्या गुलामीचे बंध
- तोडून शुभ्रवस्त्रांकित
- मुक्त निळा पक्षी दिला होता…
- पृ क्र ५८
ही कविता बौध्द मानसाने कशी क्रांती केली यांची महत्ती प्रकट करते.शेतकरी या जगाचा पोशिंदा पण आज तो आत्महत्या करतो आहे.सरकारच्या खाजगीकरण,उदारिकरण,व जागतिकीकरण यांनी को देशोधडीला लागला आहे.शेतकरी विषयावरील कविता शेतकरी बांधवाच्या व्यथा व वेदना रेखांखित करतात.माझ्या जन्मदात्यांनो,माझ्या मातीची उध्दिग्रता,शेतातल्या मातीत मी,शेतात राबण्याचा,गणित बळीच्या आयुष्यातलं,रानपाखरांची माय,काय घेऊन जाशील या कवितातून जगाच्या पोशिंद्याची वास्तविकता अचूक टिपली आहे.ते “गणित बळीच्या आयुष्यातलं “या कवितेत लिहितात की,
- स्वप्नातील गणितं अनेकदा चुकताना अनुभवलं असतं त्यानं
- तरी ही पुन्हा पुन्हा तो मांडत जातो शेती
- माती+बियाणं+पाऊस+मेहनत=वार्षिक उत्पन्न
- वार्षिक उत्पन्न-उत्पादन खर्च =शून्य
- या शून्यानं संसाराचाही अंतिम हिशेबही शूनेयचं उरते.
- पृ क्र १११
ही कविता शेतकरी बांधवाच्या विषमतेची चिरफाड करते.शेतकरी आंदोलन करत असतांना सरकार झोपेचं सोंग घेते .आता शेतकरी व कामगार यांनी आंबेडकरी क्रांतीजाणिवाचा अंगार होऊन नव्या परिवर्तनासाठी सज्ज राहावे असा सल्ला कवी देत आहे.
कवीने लॉकडाऊनच्या काळात लोकांना जो त्रास शहन करावा लागला ,चटके शोसावे लागले.य यांचे ज्वलंत चित्रण रेखाटले आहे.ते “कोरोना आणि अस्पृश्यता “या कवितेत लिहितात की,
- असे जातीयतेचे विषाणू बरेच पचवलेत आम्ही
- पण एका डॉक्टरनं त्यावर अशी लस शोधून काढली की
- त्याच्या प्रज्ञाऊर्जेनं जाळून टाकलेत सारे वळवळणारे विषाणू
- समता, बंधुता, न्याय,स्वातंत्र्य,हक्क अधिकाराच्या इंजेक्शनच्या भीतीने
- पार्श्वभागाला पाय लावीत पळाले आपापल्या बिळात
- कधी न वळवळण्यासाठी…
- पृ क्र ८५
या कवितेत एका डॉक्टरनं या शब्दाएेवजी डाँ बाबासाहेब आंबेडकर हा शब्द वापरला असता तर सामान्य वाचकाला यांचा अर्थ लवकर समजला असता असे वाटत कवीची दृष्टी अचूकता हेरणारी असावी.कोरोनाच्या काळातील अस्वस्थ भावना प्रगट करतांना त्यांनी “गर्दी अशी पागायला नको होती”या कवितेतून आपल्या भावना प्रस्फोटीत केल्या आहेत,
- पण लॉकडाऊनमुळे पुन्हा आम्ही आपआपल्या घरी बांधलोत.
- गर्दी अशी पागायला नको होती.
- तिचा चेहरामोहराच बदलवून टाकला एका अनामिक विषाणूने.
- आता आम्हाला गरज भासणार नाही मिणमिणत्या दिखावू काजव्यांच्या उजेडाची.
- आम्ही त्या शाश्वत उजेडाच्या दिशेने निघालो पाहिजे कायमचे..
- पृ क्र २३
या कवितेतून वैचारिक उजेडाचे सहप्रवासी होण्याचे आवाहान कवी जनतेला करत आहे.सारा देश अंधाऱ्या काळोखात लटपटत आहे.माणसाचे स्वप्न उद्धवस्त झाले आहे.दोन भांडवलदाराने देशाची वाट लावली आहे.सरकारला मदत करून सारी यंत्रणा कंन्ट्रोल करत आहेत.जीवघेण्यास्पर्धेत शेतकरी,कामगार,बेरोजगार, मागासवर्गीय,शोषित,भटकेविमुक्त,आदिवासी ,स्त्री यांचे सैंवधानिक अधिकार नाकारल्या जात आहे.संविधानाची पायमल्ली केली जाते.देशात अनागोंदी काम सुरू आहे.धर्माची राजकारणात सळमिसळ केल्याने देशाचा पाया खिळखिळा होत आहे.पुरोगामी विचारवंत,कलावंत,कार्यकर्त,विद्यार्थी यांना खोट्या खटल्यात अटकवले जात आहे.टकली गँग निरपराध माणसांना मारण्याची फौज तयार करत आहे.अशा अंधकारमय आभासी देशात कवी सरकारला घाबरत नाही कारण त्याच्या हातात संविधान नावाचं न्यायतंत्र आहे.ते “मी उजेडाच्या दिशेने निघालो”या कवितेत लिहितात की,
- रक्तबंबाळ होऊन थकलेली माझी पावलं
- आता तुझाच अष्टांग मार्ग चोखाळणार आहेत बुध्दा
- भरकटलेली पावलं
- तुझ्याकडेच येत आहेत शांतीदुता
- मी उजेडाच्या दिशेने निघालो…
- पृ क्र ३६
ही कविता माणसाला बुध्द् धम्माच्या मार्गावर येण्याचा संदेश देणारी आहे.बुध्द तत्वज्ञान हेच माणूसकीचे तत्वज्ञान आहे.बुध्दा शिवाय जगाला तरणोपाय नाही. या कवितासंग्रहातील अनेक कविता विशेषतत्वाने ल्यालेल्या आहेत.जोतीबा,बोधी वृक्षाखाली,असाच असतो बाप,मानवमुक्तीचा जाहिरणामा,सावित्रीमाई,रमाई माऊली,बाबासाहेब,डोक्यात बुध्द् आहे,जागल्या व्हायचं मला,पेटते हे रानं आहे,स्वातंत्र्य ,गावकुसाबाहेरील वेदना,संत गाडगेबाबा,ऊर्जादायी दीक्षाभूमी,या कवितेचा आशय गंभीर नवपरिवर्तनाचा ध्यास घेतणारा आहे.ते “बाबासाहेब..!”या कवितेत लिहितात की,
- बाबासाहेब!
- तुमच्या प्रज्ञेच्या पाण्यानं रोपट्यांना सिंचण्याचं काम करू इच्छितो
- त्रिवार “जयभीम”उच्चारूण झोपलेल्यांना जागे करू इच्छितो.
- पृ क्र ६३
ही कविता आंबेडकरवादी कार्यकर्त्याला नवी ऊर्जा देणारी आहे. आजचे जग फसवे आहे.कमालीची अस्वस्थता निर्माण करणारे आहे.माणसाचे माणूसपण नाकारणारे आहे.भांडवलदारी अल्पजनांनी बहुसंख्य माणसाना गुलाम करण्याची नवी व्यवस्था उभी केली आहे.जात,धर्म,पंथ,लिंग,वंश,यांची समानता नष्ट होत आहे.संविधान व्यवस्था उलथवून प्राचिन विकृत व्यवस्था लादण्यासाठी टपोरी गँग संधी शोधत आहे.अशा काळोखगर्भी वातावरणात कवी हिमालयावर पाय रोवून उभा आहे.मुलतत्ववाद्यांना पराजीत करण्यासाठी तो आंबेडकरवादी विचाराची अग्नीक्षेपणास्त्र घेऊन उजेडाच्या दिशेने निघाला आहे.इहवादी देशाला आपल्या कवितेतून वाचवत आहे.मानवतेच्या बंधुभावाला जोपासतो आहे.या कवितासंग्रहात काही मर्यादाही आहेत.अनेक कविता निंबधवजा आहेत.शब्दांचीरचना तटलेल्यासारखी वाटते.या छोट्या मर्यादा असल्या तरी हा कवितासंग्रह अत्यंत क्रांतीदर्शी व परिवर्तनाचा जाहिरणामा अधोरेखित करणारा आहे.त्यांची कविता उजेडाचे गाणे गात लोकांना सचेत करत निघाली आहे.काळोख पेरणाऱ्या अंधारध्रुवावर प्रकाशाची चाल करून उजेडाची नवी अजिंठा खोदणारी ही कविता माणूसकीचा नवा आयाम आहे.हा कवितासंग्रह मध्यमा प्रकाशन नागपूर याने प्रकाशित केलेला आहे.मुखपृष्ठ व मलपृष्ठ अत्यंत चिंतनिय आहे.एकुण मूल्य दोनशे विस रूपये आहे.कवीने अशाच स्वरूपात आपला काव्यप्रवास सदोदीत सुरू ठेवावा.कविच्या अभिव्यक्त शब्दसृनतेला लाख लाख मंगलकामना चिंतितो…!
- -संदीप गायकवाड
- नागपूर
- ९६३७३५७४००
- कावितासंग्रह : मी उजेडाच्या दिशेने निघालो
- कवी : अरुण हरिभाऊ विघ्ने
- मोबाईल : ९८५०३२०३१६
- मूल्य: २३० रुपये
- प्रकाशन: मध्यमा प्रकाशन,नागपूर