मुंबई : मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची अग्रणी घोडदौड सुरु आहे. देशातील विविध विकास प्रकल्पांच्या वेगाने सर्वसामान्यांचे जीवन गतीमान झाले आहे.याच सर्वसामान्यांमधून आलेले पंतप्रधानांचे मन बरेच मोठे आहे.वेळोवेळी त्याची प्रचिती देशवासियांना आली आहे. आता पंतप्रधानांनी मनाचा मोठेपणा दाखवत शिवसेनेला राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) घ्यावे, अशी विनंती भाजप नेते आनंद रेखी यांनी सोमवारी केली.लवकरच यासंबंधी पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे कमकुवत, निष्क्रिय सरकार जावून हिंदुत्वाच्या विचारावर नवीन सरकार सत्तेत आले आहे. ही बाब अत्यंत आनंददायक आहे.मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळ शिवसेनेसोबत भाजपची यूती होवून त्या सरकारने जनसेवा करावी,अशी जनमानसाची भावना आहे.हे सरकार सत्तेवर आल्याने राज्यातील जनतेचा विकास होईल, हे नक्की. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे हुशार,उत्तम प्रशासक, कायदेतज्ञ उपमुख्यमंत्री राज्याला लाभले आहेत.त्याच्या अभ्यासवृत्तीमुळे राज्यातील अनेक रखडलेले प्रश्न मार्गी लागतील,यात दुमत नाही.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न असो अथवा जलयुक्त शिवार योजना,सर्वच चांगल्या योजनांना आता गती मिळेल.भाजपने पुन्हा एकदा त्यांचे २५ वर्ष जुने समविचारी मित्र शिवसेनेसोबत सरकार बनवले आहे.पंरतु, उद्धव ठाकरे जर यावेळी सोबत असले असते तर या सरकारला आणखी बळ मिळाले असते.त्यामुळे आता पंतप्रधानांनी पुन्हा एकदा सुखद धक्का देत शिवसेनेला एनडीएमध्ये सोबत घेवून देशासह राज्याच्या विकासात शिवसेनेला भागीदार करून घ्यावे,अशी विनंती यानिमित्ताने आनंद रेखी यांनी केली आहे.