“कविता म्हणजे काय ? तर कविता म्हणजे खुप मोठा अविष्कार, व्यापक अशी संकल्पना किंवा जगलेलं, भोगलेलं आशयपूर्ण शब्दबद्ध वास्तव “. तसेच कविता लिहून काय भेटते ? असे जर कुणी मला विचारले तर मी स्वाभिमानाने सांगेन, एखाद्या बाळंतिणीला मूल झाल्यानंतर मातृत्वसुखाचा जो आनंद मिळतो तोच आनंद कविलाही कविता पूर्ण लिहून झाली की होत असतो , असे मनोगत मांडणारे डोणगाव, जि. बुलडाणा येथील कवि सुनील दौलतराव खोडके यांचा ‘ काळ नक्कीच नोंद घेईल ‘ हा पहिलाच कवितासंग्रह नुकताच प्रशांत ढोले यांचे मार्फत प्राप्त झाला . परिस पब्लिकेशन, पुणे यांनी प्रकाशीत केलेल्या या कवितासंग्रहात एकूण ७८ मुक्तछंदातील रचनांचा समावेश आहे . प्रस्तावना डाँ. राजेंद्र गोणारकर यांची तर पाठराखण कवि लोकनाथ यशवंत यांनी केली आहे . हा कवितासंग्रह त्यांनी आपल्या सहचारीनी सौ. रेखा यांना समर्पीत केला आहे .
प्रस्तावनाकार डाँ.गोणारकर सुनील खोडके यांच्या कवितेविषयी …
” कवी सुनील खोडके यांची एकूणच कविता भावविभोर होताना जगण्याचे सुस्पष्ट भान देणारी कविता आहे . कविने या संग्रहातील काही कवितांमधून अनुभवद्रव्याशी ईमान राखून केलेली अभिव्यक्ती लक्षवेधी म्हटली पाहिजे .समाजक्रांतीच्या वाटेवर मार्गक्रमण करताना परिवर्तनाची हाक देणारी ही मनस्वी कविता आहे .साधे शब्द,सोपी मांडणी पण आशयाभिव्यक्तीचे सामर्थ्य लाभलेली एक ओजस्वी कविता असल्याचे ” मत व्यक्त करतात . तर लोकनाथ यशवंत यांच्या मते, ” सुनीलजींनी आपल्या मनात एक छोटा मुलगा जपून ठेवला असल्याचे म्हटले आहे.”
कविचा जीवनप्रवास खरतड असल्याची जाणीव कविता व मनोगत करून देते . त्यांनी आपल्या आयुष्यात जे भोगलं, सोसलं, बघितलं तेच वास्तव कवितेतून मांडलं आहे .
नात्यातील भावबंध उलघडताना ‘सन्मान’ ही पहिलीच कविता स्त्रीत्वाच्या त्यागाचा, मनाच्या मोठेपणाचा गौरव करताना दिसते. पुरूषी अहंकार त्यांची कविता नाकारते .
स्वतःकडून कळत न कळत झालेल्या चुकांवर पडदा न घालता त्यांची प्रांजळपणे कबुली देतांना ‘मी क्रांती केली ‘ असं संबोधतात . आपली चुक कबूल करायला मनाचा मोठेपणा लागतो, तो त्यांच्या कवितेतून ओसंडून वाहतो. संसार सुखाचा व्हावा यासाठी अर्धांगीणीची साथ ही मोलाची असते आणि ती पुर्णतः मिळाल्याची कबुलीही त्यांची कविता देते . आयुष्याचा गाडा ओढण्यासाठी कोणतंही काम लहान-मोठं नसतं, मग पिठ गिरणी का असेना, तीही पोटाची खडगी भरण्यास मदत करते .
प्रत्येकाला आपली आई ही गुरूस्थानी आणि ममतेच भांडार असल्याचं लिहील्या जातं. कविचंही मत या वेगळं कसं असेल ? मुल म्हटलं की कुण्याही आईसाठी तिच्या काळजाचा तुकडाच असतो .
” घामेजलेला देह नि उर
वझ्याने भरून आलेला असतानाही
माय द्यायची चिंताग्रस्त स्वरात
माघारी हाक
बाबू आला का…रे ..? म्हणत .”
नात्यांची गुंफण ही एका माळेसारखी असते. त्यातील प्रत्येक फूल हे विश्वासाच्या नात्याने एकमेकांशी घट्ट जोडलेलं असतं . हळव्या मनाचे विविध कंगोरे उलघडताना, त्यात माय , बाप , पत्नी , मुले असो . या सर्वांमिळूनच एक कुटुंब पूर्णत्वास जातं . आणि हे कुटुंब ज्या चार भिंतीवर छप्परासह उभं असलेल्या त्या निवासास झोपडी/घर म्हणता येईल .ज्यात एकमेकांची काळजी वाहणं हा प्रत्येक मनाचा स्थाईभाव असतो . ही नाती खोडके यांची कविता काळजीपूर्वक जपते . मानवी समाजाला एक संदेश देते . बाप घराचं सर्वस्व असतो . जेव्हा माणूस बापाची भूमीका वठवितो तेव्हाच बापाची महती कळते . हे वास्तव आहे. एवढच काय तर घरातील वस्तूं आणि पाळीव पशू-पक्ष्यांचाही आपल्याला तेवढाच लळा लागतो . त्यांचेही योगदान आपल्या आयुष्यात अनन्यसाधारणच असते .
कविता माणूस कशासाठी लिहीतो ? तर आयुष्यात जगलेले, भोगलेले, बघितलेले क्षण शब्दबद्ध करता यावेत . ते साहित्यकृतीच्या कोंदनात गोंदून ठेवता यावेत, जिवन जगताना त्या अनुभवाच्या शिदोरीवर मानवाला आपले आयुष्य सुकर जगता यावे, हाच उद्देश असावा . माणसाच्या आयुष्य हे एका शून्यापासून तर दुस-या शून्यापर्यंतचा प्रवास असतो .” खाली हाथ आया है, खाली हाथ जायेगा “. हे जिवनाचे मर्म ज्याला कळले त्याच्या आयुष्यात मनाच्या मलीनतेला वाव नसतो .भगवान बुद्ध राग, लोभ, द्वेश, मत्सर, घृणा,मोह,माया, अहंकार हे मानवी मनाचे विकारच मानवाच्या दुःखाचे कारण असल्याचे सांगतात . दुःखमुक्त जीवन जगायचे असेल तर या विकारांना मनातून घालविले पाहिजे . मनावर नियंत्रण मिळविले पाहिजे , असे सांगतात . आणि हे तत्व अंगीकारल्याचे खोडके यांच्या कवितेतून आपल्याला दिसून येते.
” अर्पण करावा आयुष्यातला
एखादा क्षुल्लक क्षण
शोषीत पिढीतांसाठी
जगून पहावे थोडे इतरांसाठी
समर्पित भावनेचा घ्यावा
परमोच्च आनंद एकदा तरी ..”
कविच्या मते आपण आपल्यासाठी तर जगतच असतो पण त्यातील काही मोजके क्षण इतरांसाठी खर्च केले पाहिजे . त्यातूनही अपार आनंद मनाला मिळत असतो,आपण काहीतरी वेगळं केल्याचं समाधान आपल्याला मिळत असते . दोन्ही बाजूने हे मिळणारं सुख कोणत्याही मोजपट्टीत मोजता येत नाही . समता, स्वातंत्र्य,बंधुता,न्याय ही मानवी मूल्य मानवी जिवनात मोलाची आहेत .
कवि समाजातील वंचीत घटकांवर खुप प्रेम करतात . त्यांच्या व्यथा बघून अस्वस्थ होतात . त्यांच्या एका कवितेत वेगवेगळ्या तीन प्रतिमांचा उल्लेख आलेला आपणास दिसतो . छोटंसं किराना दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करणारा ‘जलालखाँ’ , कायम वांझपणाचं दुःख कवटाळून छळवणूक,पिळवणूकीच्या अग्नीत होरपळलेली इंद्रा नावाची म्हातारी. तिसरा म्हणजे पाहूना म्हणून आलेला व आपल्या गुणामुळे आयुष्याचं शिखर पार करणारा कांबळे मिस्त्री . ह्या तिनही व्यक्तिरेखा आपल्या समोर असलेल्या परिस्थितीवर मात करून जीवन जगण्याची रीत शिकवून जातात. तसेच पहाटेच बाग देऊन संधीचं सोनं करणा-याला जाण करून देणारा कोंबडा, वाटसरूंच्या स्वागतासाठी सज्ज असलेल्या वाटा आणि कोमेजलेल्या मनाला तजेलपणा बहाल करणारी थंड वा-याची झुळूक . या तिनही गोष्टी मानवाला नवचेतना बहाल करीत असतात . मला ही कवितेची शक्तीस्थळे वाटतात . यात आपलाच आपल्याशी संघर्ष असतो .
पण हल्लीच्या धकाधकीच्या व स्पर्धेच्या युगात माणुसकी, आपुलकी हरवत चालली की काय ? असे कवि मनाला वाटून गेल्याशिवाय राहात नाही . उद्वेगाने का होईना ? कवि पुढील ओळीतून आपले स्पष्ट मत नोंदवित असल्याचे दिसतात .
” अलीकडे आपुलकी केव्हाच चेंगरून मेली आहे
मी पणा अंगिकारलेल्या
माणसांच्या विशाल गर्दीत .”
समाज म्हटलं की, एकमेकांच्या आपुलकीची, सहानुभूतीची, प्रेमाची, सहकार्याची गरज भासत असते . पुर्वी लोक गरीब होते पण मनाची श्रीमंती ओसंडून वाहत होती . आता माणूस जेवढा संपत्तीने श्रीमंत झाला, तेवढाच तो मनाने गरीब होत चालल्याचे निदर्शनास येते . हे वास्तव बहु अंशी खरे आहे . माणूस गाडी, माडी, मुले, नोकरी, घर यापुर्ताच सिमीत होत चाललेला असल्याचे कविला सुचवायचे असावे . जशी गुणवत्ता ही जात-धर्म बघून मानवात येत नसते तशीच श्रीमंती-गरीबीही बघून नाही . तर गुणवत्ता अलिकडे आपल्याला दारिद्र्यातही चमकताना दिसते.
हा शिक्षणाचा, त्यागाचा, प्रयत्नांचा, जिद्दीचा परीपाक आहे . ही सामाजीक जाण आहे.
कवि कवितेवर खुप प्रेम करतात . आपण कशावरही अखंडपणे लिहीत राहावे ,असे कविला वाटते . एवढच नव्हे तर त्याही पुढे जावून ते म्हणतात …
” कवितेला ..
मी करावा सतत मानाचा मुजरा
माझा अंत्यसंस्कारही
व्हावा
काव्योत्सहातच
साजरा ..”
कवि आणि कविता वेगळी नसते ,नसावी, ते दोघेही एकरूप होऊन जातात. कविच्या प्रतिभेचं,सर्जनशीलतेचं,चिंतनाचं,अनुभवाचं,विचारांचं, मनाचं,स्वभावाचं,भाव-भावनांचं प्रतिबिंब त्याच्या रचनेत दिसत असतं, म्हणूनच ते वेगळे नसतात. कवि कवितेशिवाय वेगळा असू शकत नाही. कवी आपल्या आयुष्यातील रीतेपण, भरलेपण आपल्या कवितेजवळ मांडत असतो. त्याही पुढे जाऊन माझा मरणसोहळा देखील काव्योत्सहातच पार पडावा ,अशी इच्छाही कवी व्यक्त करतो . असं विविधांगी वास्तव कवी आपल्या रचनांमधून बेधडक मांडतो . हेच खरं एका साहित्तिकाचं आपल्या साहित्यकृतीशी एकरुप होऊन जगणं असतं .
या कवितासंग्रहातील सर्वच रचना या मुक्तछंद काव्यप्रकारातील आहेत . साधी सरळ, सोपी शब्दयोजनशैली, मोजक्याच पण योग्य प्रतिमांचे उपयोजन ,शब्दांचा फापटपसारा टाळून योग्य आशय शब्दबद्ध झालेला दिसतो . समाजात अजूनही प्रत्येक क्षेत्रात विषमता कायम आहे . ही विषमता काळानुरूप दूर होईल असा आशावादही कवि व्यक्त करतो. त्यांच्या या आशादायी मनोकामनेची येणारा ‘ काळ नक्कीच नोंद घेईल ‘ अशी आशा करायला हरकत नाही . खोडके यांची कविता समाजभान आधोरेखीत करते, परिवर्तनवादी विचार मांडते, ती कल्पनेवर आधारीत नसून वास्तव स्थिती बयान करते ,ती दिशादर्शक आहे, ती शोषीकांच्या व्यथानांही तितक्याच मायेच्या हाताने कवटाळते , सदर पुस्तकातील माझ्या मनाला भावलेल्या पुढील रचना अशा …
बाप, माय,भाकर आणि निरुत्तर प्रश्नांचा काळ, संघर्ष अजून बाकी आहे, उत्खनन, घराच्या जुन्या भिंती,बुद्ध, शेवटी कविता जिवंत राहील, काळ नक्कीच नोंद घेईल इत्यादी. तद्वतच दवंडी मास्तर ही उपेक्षीत व्यक्तिरेखा मनात घर करून जाते .
जितेंद्र साळुंके यांचे अप्रतिम मुखपृष्ठ व रेखाटने, शीर्षक,पुस्तकाची छपाई व बांधणी या बाबी पुस्तकाचं आंतर-बाह्य सौंदर्य वाढविणा-या आहेत . मुद्रण दोष सोडले तर एकूणच पुस्तक वाचकांना आवडेल .लयबद्ध व इतर छंदबद्ध प्रकारही कविने हाताळावेत, असे वाटते . पुढील साहित्यकृती , कसदार व ज्वलंत सामाजीक जाणीवा घेऊन येईल, अशी आशा करायला हरकत नाही .तूर्तास एवढेच .
अरुण हरिभाऊ विघ्ने
रोहणा,आर्वी,वर्धा .
————————————————-
कवि: सुनील दौलतराव खोडके
कवितासंग्रह: काळ नक्कीच नोंद घेईल
प्रकाशन : परिस पब्लिकेशन, पुणे
पृष्ठसंख्या : ९६
मूल्य : १५०/-₹
मो.९१६८५३५८१०/७०५७५९१११७
Related Stories
September 21, 2024
September 21, 2024
September 21, 2024