जिज्ञासा कायम ठेवून ‘अपडेट’ होत राहणे ही काळाची गरज -माजी माहिती संचालक राधाकृष्ण मुळी
अमरावती : डिजीटल युगात माहिती सेवेत विविध जबाबदा-या निर्माण होऊन कामांचे स्वरूप विविधांगी व विस्तीर्ण झाले आहे. त्यामुळे निरनिराळ्या विषयांबाबत जिज्ञासा कायम ठेवून स्वत:ला ‘अपडेट’ करत राहणे आवश्यक असल्याचे माजी माहिती संचालक राधाकृष्ण मुळी यांनी आज येथे सांगितले.
अमरावती येथील माहिती उपसंचालक पदावर कार्यरत असतानाच श्री. मुळी यांना माहिती संचालकपदी पदोन्नती मिळाली व ते औरंगाबाद येथून मराठवाडा विभागाचे माहिती संचालक म्हणून नुकतेच निवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीनिमित्त आज अमरावती विभागीय माहिती कार्यालयातर्फे निरोप समारंभ आयोजिण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, प्र. उपसंचालक तथा जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, सहायक संचालक गजानन कोटुरवार आदी उपस्थित होते.
श्री. मुळी म्हणाले की, डिजीटल माध्यमांनी सार्वजनिक क्षेत्रात क्रांती घडवली असून, संज्ञापनाची पद्धती विविधांगी व गतिमान झाली आहे. त्यामुळे माहिती सेवेत असताना सतत अद्ययावत होत राहणे ही गरज झाली आहे. शासकीय कर्तव्य बजावत असताना शासकीय नोकरीत कर्तव्य बजावत असताना अनेक अडचणी येत असतात. मात्र, त्यावर मात करत सांघिक प्रयत्नांनी काम पुढे न्यायचे असते. आपल्या कामात टीमवर्कचे मोठे महत्व आहे. त्यामुळे कर्मचा-यांप्रती बांधीलकी जोपासून त्यांच्यात कामाप्रती विश्वास निर्माण केला पाहिजे.
महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर अशा 20 जिल्ह्यातील सेवेतील विविध अनुभव त्यांनी यावेळी कथन केले.श्री. खडसे, श्री. पवार, श्री. कोटुरवार, सहायक माहिती अधिकारी विजय राऊत, पल्लवी धाराव, माजी स्वीय सहायक तथा वन अभ्यासक प्र. सु. हिरूरकर, प्रदर्शन सहायक हर्षदा गडकरी, कॅमेरामन नितीन खंडारकर, वरिष्ठ लिपिक विश्वनाथ धुमाळ आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले. छायाचित्रकार मनिष झिमटे, सागर राणे, कॅमेरामन कुमार हरदुले, लेखापाल विजया लोळगे, वरिष्ठ लिपीक मनोज थोरात, लिपीक दिनेश धकाते, योगेश गावंडे, रुपेश सवाई, गजानन परटके , वाहनचालक गणेश वानखडे, रविंद्र तिडके, विजय आठवले, सुधीर पुनसे, हर्षराज हाडे, कोमल भगत, सुरेश राणे, प्रतीक वानखडे, विश्वनाथ मेरकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती सहायक पल्लवी धारव यांनी केले. श्री. कोटुरवार यांनी आभार मानले.