नवी दिल्ली :महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येणार अशी चर्चाही सुरु झाली आहे. आता एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिलेल्या नव्या माहितीमुळे सरकारच्या चिंतेत भर पडली आहे. डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात सापडलेल्या रुग्णांमध्ये नवीन प्रकारचा कोरोना विषाणू आढळून आला असून हा विषाणू अधिक संसर्ग घडवून आणणारा आणि धोकादायक आहे. विशेष म्हणजे ज्यांच्या शरीरात कोरोनाच्या अँटीबॉडी तयार झालेल्या आहेत अशांना सुद्धा या नव्या विषाणूचा संसर्ग करू शकतो. यामुळे ज्यांचे लसीकरण झाले आहे त्यांना जर पुन्हा लागण झाली तर तो कोरोनाचा नवा व्हेरिएन्ट आहे असे समजावे. कोरोना होऊन गेलेल्या लोकांना पुन्हा एकदा हा कोरोना विषाणू बाधित करून शकतो.
सध्या महाराष्ट्र, केरळ, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि पंजाब या पाच राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.या पार्श्वभूमीवर डॉ गुलेरिया यांनी दिलेली माहिती महत्वाची ठरत आहे. ते म्हणाले की, ह्ल विषाणू आपल्यात सतत परिस्थितीनुरूप बदल करत असतो. असा बदल त्यास रुग्णाच्या शरीरातील अँटीबॉडीज विरुद्ध लढण्यास अधिक मदतगार ठरतो. यामुळे कोरोना लस घेतलेल्या लोकांना पुन्हा एकदा संसर्ग होऊ शकतो. कोव्हिडची लस या नव्या कोरोना व्हेरिएन्टवर प्रभावी ठरू शकते मात्र तिची कार्यक्षमता तितकी असणार नाही. मात्र कोरोनाचा संसर्ग लस घेतल्यामुळे सौम्य असू शकतो. यामुळेच लस घेणे हे तितकेच आवश्यक ठरते. काल आणि आज राज्यातील मुंबई, पुणे , नाशिक, नागपूर या शहरांसोबत विदर्भात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती, अकोला, नागपुरात लॉकडाऊन घोषित केला आहे. तर पुणे, नाशकात रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठ दिवसात परिस्थितीचा आढावा घेऊन लॉकडाऊनचा निर्णय घेणार असल्याचे जनतेशी साधलेल्या संवादात म्हटले आहे. जर अशीच रुग्णांची संख्या वाढत राहिली तर राज्यात लॉकडाऊन लागू करणे भाग असेल.