पुणे:कोरोनाचे निर्बंध आणि आडकाठी फक्त महाराष्ट्रातच का? इतर राज्यात सगळं सुरळीत सुरू आहे. तिसरी लाट येणार म्हणून आपण आतापासूनच घाबरून बसायचे याला काय अर्थ आहे? लोकांचे हाल कधी बघणार?, असा संतप्त सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राज्य सरकारला केला. दुष्काळ आवडे सर्वांना तसं लॉकडाउन आवडे सरकारला, अशी सध्याची परिस्थिती आहे, असा बोचरा टोलाही राज ठाकरे यांनी हाणला.शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे आज पुण्यात आले आहेत. तिथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना आपल्या रोखठोक शैलीत उत्तरं दिली. लॉकडाउनच्या मुद्दय़ावरून त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री किंवा सरकारमधील मंत्री सर्वसामान्यांसाठी उपलब्ध नसल्याच्या तक्रारीबद्दल त्यांना विचारण्यात आले होते. त्यावर बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्री किंवा त्यांचे मंत्री हे लोकांना भेटतात की नाही, हय़ाच्याशी खरंतर लोकांनाही काही देणंघेणं नसतं. राज्य व्यवस्थित चालावे. सोयीसुविधा व्यवस्थित मिळाव्यात एवढीच त्यांची अपेक्षा असते.
आता रेल्वे सुरू करण्याचा विचार राज्य सरकार करतं असं आम्ही ऐकतोय. पण लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या, असं मी आधीच सांगितले होते. लोकांच्या नोकर्या गेल्या आहेत. उद्योगधंदे बुडाले आहेत. घरं कशी चालवायची कळत नाही? मुलांच्या फीया कशा भरायच्या हा प्रश्न आहे. सरकारला लॉकडाउन करायला काय जातंय? भोगावे सामान्य माणसाला लागतंय. पण हय़ांना कोणी प्रश्न विचारायचे नाही असं एकंदर चित्र आहे, असं राज ठाकरे म्हणाले.