नवी दिल्ली : भारताचे महान माजी धावपटू आणि फ्लाईंग सिख अशी ओळख असलेले मिल्खा सिंग यांचे निधन झाले आहे. ते ९१ वर्षांचे होते. मोहालीतील एका रुग्णालयात मिल्खा सिंग यांना दाखल करण्यात आले होते. कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना बुधवारी जनरल आयसीयूत ठेवण्यात आले. त्यानंतर मिल्खा सिंग यांना अचानक ताप आला. शिवाय त्यांच्या ऑक्सिजन पातळीतही घसरण झाली. काही दिवसांपूर्वी मिल्खा यांच्या पत्नीचेही कोरोनामुळे निधन झाले होते.
गेल्या महिन्यात मिल्खा सिंग यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. यानंतर त्यांना मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. आठवडाभर उपचारानंतर त्यांना घरीही सोडण्यात आले होते. घरी परतल्यावर त्यांची ऑक्सिजन पातळी खालावली, त्यानंतर त्यांना पीजीआयएमईआर चंदीगडमध्ये दाखल केले गेले.
मिल्खा सिंग यांचा जन्म २0 नोव्हेबर १९२९ रोजी पाकिस्तानातील पंजाबमध्ये झाला. त्यावेळेस भारत-पाकिस्तान फाळणी झाली नव्हती. १९५८च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील २00 आणि ४00 मीटर प्रकारात त्यांनी सुवर्णपदक जिंकले होते. अशी कामगिरी करणारे ते एकमेव भारतीय खेळाडू ठरले. मिल्खा सिंग यांनी दक्षिण आफ्रिकेच्या मॅल्कम स्पेन्सला हरवून ४६.६ सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. तर २00 मीटर शर्यतीत त्यांनी पाकिस्तानच्या अब्दुल खालिकचा पराभव केला.
मिल्खा यांनी ही धाव केवळ २१.६ सेकंदात पूर्ण केली. १९६२मधील जकार्ता एशियन गेम्समध्ये मिल्खा सिंग यांनी ४00 मीटर आणि ४७४00 मीटर रिलेमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. १९५९मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील मिल्खा सिंग यांचा विक्रम ५0 वर्षांहून अधिक काळ कायम राहिला होता. २0१0 दिल्ली कॉमनवेल्थ गेम्समध्ये कृष्णा पुनियाने डिस्कस थ्रोमध्ये सुवर्ण जिंकून हा विक्रम मोडित काढला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मिल्खा सिंग यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
Related Stories
September 17, 2024
September 14, 2024