अमरावती : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेत शासनाकडून शेतकऱ्यांच्या याद्या प्राप्त झालेल्या असून, या यादीमधील शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणाचे कामकाज पूर्ण करण्यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक राजेश लव्हेकर यांनी दिली.
कर्जमाफीच्या पोर्टलवर नाव असलेल्या सर्व पात्र कर्जदार खातेदारांसाठी ही शेवटची संधी असून, 15 नोव्हेंबरपूर्वी आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधकांनी केले आहे.
मयत खातेदारांच्या कर्ज खात्यासंबंधी वारसांनी आवश्यक कागदपत्रासह बँकेकडे त्वरित कागदपत्रे सादर करावीत. पात्र खातेदारांना एसएमएसद्वारे सूचना प्राप्त झाल्यास जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. गावातील खातेदारांनी आपल्या बँकेशी संपर्क साधून आपले नाव कर्जमाफीच्या यादीमध्ये समाविष्ट आहे किंवा कसे, याची खात्री करून घ्यावी. कर्जमाफी किंवा आधार प्रमाणीकरणाबाबत अडचण येत असल्यास संबंधित तालुक्याचे सहाय्यक निबंधक कार्यालय तसेच आपल्या बँकेचे संपर्क साधावा.
विशेष मोहिमेचा सर्व संबंधितांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधकांनी केले आहे.