मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषा दिनानिमित्त सर्व मराठी भाषिकांनी किमान आपली स्वाक्षरी तरी मराठीमध्ये करा असे आवाहन केले आहे. दादर येथे मनसेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मराठी स्वाक्षरी मोहीम या कार्यक्रमाला राज यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मराठी भाषिकांनी आपली स्वाक्षरी मराठीमध्ये केली तर मराठी भाषा टिकण्यास मदत होईल असे मत व्यक्त केले.
मराठी स्वाक्षर्यांच्या मोहिमेचा मराठी संवर्धनासाठी किती फायदा होईल असा प्रश्न राज यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना राज यांनी, कार्यक्रम आम्ही पहिल्यांदा घेतला नाहीय असे म्हटले आहे. तसेच पुढे बोलताना राज यांनी, दरवर्षी हा कार्यक्रम होत असला तरी या वर्षी आम्ही मोठय़ा प्रमाणात कार्यक्रम करण्याचे ठरवले.
माझी इच्छा आणि आणि विनंतीही आहे मराठी बांधवांना की आपली स्वाक्षरी मराठीमध्ये झाली तर सतत आपल्या मनामध्ये आपण मराठीमध्ये, मराठी भाषेसाठी काहीतरी करतोय याची खूणगाठ बांधली जाते. एक मनात राहते की मी मराठीत सही करतोय. माझ्या पासपोर्टपासून इतर ठिकाणीही मराठीमध्ये सही आहे. त्यामुळे इतर लोकं जेव्हा बघतात तेव्हा त्यांना पण वाटतं की ही बाबा वेगळी सही आहे.
मी माझ्या पत्रातही म्हटले आहे की प्रत्येक वेळेस असं आसवं गाळतं बसणं की मराठीचे काय होणार मराठीचे काय होणार?, याऐवजी काही गोष्टींची सुरुवात करणे गरजेचे आहे.
माझी सर्वांना विनंती आहे की आपली बँक खाती आणि इतर ठिकाणी जाऊन सांगा की आजपासून ही माझी मराठीमधली सही असेल. अशा गोष्टी सुरू झाल्या तरच या गोष्टी (मराठी संवर्धनासंदर्भातील गोष्टी) पुढे जातील, असे सांगितले.
दाक्षिणात्यांसारखा भाषे संदर्भातील आक्रमकपणा आला तर कोणाला काही बोलावे लागणार नाही. नुसतेच दाक्षिणात्य कशाला तर दोन गुजराती एकत्र भेटतात तेव्हा ते गुजरातीमध्ये बोलतात. मराठी व्यक्ती भेटल्यानंतर हिंदीत बोलतात. तुम्ही विचारा लोकांना ते का असं करतात ते, असेही राज यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले.