- * मातीच्या गणपतीचा वापर करावा
- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : मनपा आयुक्त डॉ.प्रविण आष्टीकर यांनी आज दिनांक ३० ऑगस्ट,२०२२ रोजी नेहरु मैदान येथील स्टॉल ला भेट दिली. यावेळी पर्यावरण संवर्धन अधिकारी महेश देशमुख, जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, माजी नगरसेवक अजय सारसकर, मनपा कर्मचारी तसेच मातीचे गणपतीचे मुर्तिकार उपस्थित होते.
प्लास्टर ऑफ पॅरीस (पी.ओ.पी.) पासुन तयार होणा-या मुर्ती या पाण्यात लवकर विरघळत नाही तसेच मुर्ती सुशोभित करण्याकरीता वापरण्यात येणारे रसायनिक रंगामुळे पर्यावरणाची हानी होते. त्या अनुषंगाने याबाबत विविध स्वरुपाच्या उपाययोजना करुन गणेशोत्सवा दरम्यान मातीच्या मुर्तीचा वापर जास्त प्रमाणात व्हावा याकरीता महानगरपालिकेकडून जनजागृती करण्याकरीता तसेच नागरीकांना मातीपासुन निर्मित मुर्ती उपलब्ध करुन देण्याचे अनुषंगाने वेळोवेळी मुर्तीकार संघटनेच्या बैठक आयोजित करुन मुर्तीकारांनी मातीच्या मुर्ती जास्त प्रमाणात तयार कराव्यात याकरीता बैठकी दरम्यान प्रेरीत करण्यात आले होते.
त्याचे फलस्वरुप म्हणुन काही मुर्तीकारांकडून मातीची मुर्ती निर्मिती सुरु करण्यात आली. सन २०१७ मध्ये सुमारे ६०००, सन २०१८ मध्ये सुमारे ८००० आणि सन २०१९ मध्ये सुमारे १८,०००, सन २०२० मध्ये सुमारे ५३,०००, सन २०२१ मध्ये सुमारे ६१,००० व यावर्षीच्या गणेश उत्सवाकरिता अमरावती शहरासाठी ७०,००० मातीच्या गणेश मुर्ती तयार करण्यात आले असल्याची माहिती मुर्तीकार संघटनेकडून प्राप्त आहे. मातीच्या मुर्ती विक्रीकरीता काही जागा राखीव ठेवण्यात यावी अशी विनंती मुर्तीकार संघटनेकडून करण्यात आली होती. त्याअनुषंगाने शहरातील नेहरु मैदान येथे काही दुकाने मातीच्या मुर्ती विक्रीकरीता राखीव ठेवण्यात आली असून यावर्षी मुर्तीकार संघटनेकडून हमीप्राप्त एकुण २२ दुकाने फक्त मातीची गणेशमुर्ती विक्री करणार असून त्यांचे विक्रीस सहाय्याकरीता महानगरपालिकेकडून प्रायोजित करण्यात आले आहेत. नेहरु मैदान येथील शाळेच्या बाजुने मातीच्या गणेश मुर्तीसाठी विक्रीसाठी दुकाने असून महानगरपालिकेकडे नोंदणीकृत मातीच्या मूर्ती तयार करणा-या मूर्तीकारांकडुन मातीच्या गणेशमूर्ती विक्री करण्यात येणार आहे तसेच महानगरपालिकेतर्फे फलक लावण्यात आला आहे. तरी संबंधीत मातीच्या गणेशमूर्ती विक्रेत्यांकडुन गणेशमूर्ती घेण्यात यावी असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.
पर्यावरण पुरक (ईको फ्रेंडली) गणेशोत्सव साजरा करण्याकरीता माती (शाडू) पासून निर्मिती केलेल्या पर्यावरण पुरक मुर्तीचा वापर करावा. गणेश मुर्ती विक्रेत्याकडे गणेश भक्तांनी मातीपासुन निर्माण झालेल्या मुर्तीची मागणी करावी असे आवाहन मनपा आयुक्त डॉ.प्रविण आष्टीकर यांनी केले आहे.