पंचायत राजमध्ये शेवटच्या घटकापर्यंत केंद्र तसेच राज्य शासनाच्या लोकाभिमुख योजना पोहोचविण्याचे मुख्य काम ग्राम पंचायत करीत असते. गावचा पुढारी सरपंच, तो जर का गावाचा सर्वांगीण विकास व्हावा. याकरिता झटत असेल तर देशातील कोणत्याही गाव खेड्याचे हिवरे बाजार किंवा पाटोदा झाल्याशिवाय राहत नाही. हे पोपटराव पवार तसेच भास्करराव पेरे पाटील यांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून सिद्ध करून दाखविले आहे. त्यांच्या कार्याचे जगभरातील राजकारणी तसेच उच्च पदस्त अधिकार्यांनी नोंद घेतली आहे. गावासाठी गेली कित्येक दशकांपासून घेतलेल्या मेहनतीमुळेच आज ही दोन्ही गावे नावारूपास आली आहे. मुदत संपलेल्या राज्यभरातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्याच्या निकालाने अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. याचप्रमाणे गेल्या २५-३0 वर्षांपासून बिनविरोध निवडणूक होणार्या हिवरे बाजार व पाटोदा येथे यंदा निवडणूक झाली. यात राळेगण सिद्धीतील नागरिकांनी पोपटराव पवारांच्या कार्याला मतपेटीतून पावती दिली. मात्र, याउलट पाडोद्यामध्ये भास्करराव पेरे पाटील यांच्या संपूर्ण पॅनलचा पराभवाने भल्याभल्या राजकीय जानकारांना विचार करायला भाग पाडले, हे तितकेच खरे. गेल्या २५ वर्षांपासून पाटोदा गावात सरपंच म्हणून बाजी मारणारे भास्करराव पेरे पाटील यांच्या संपूर्ण पॅनलला मात्र यंदाच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. राज्यात पाटोद्याला आदर्श गाव म्हणून ओळख मिळवून देणारे भास्करराव पेरे (पाटील) यांच्या कन्या अनुराधा पेरे यांचाही पराभव झाला आहे. पाटोदा ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल लागला. यामध्ये भास्करराव पेरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाटोद्यात पॅनल उभे केले. भास्कररावांच्या कन्या अनुराधा पेरे पाटील या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. अनुराधा पाटील यांना १८६ मतं मिळाली आहे तर, त्यांच्या विरोधात उभे असलेले दुर्गेश खोकड यांनी २0४ मते मिळवून विजय मिळविला आहे. भास्करराव पाटील यांच्या पॅनलचा पराभव हा धक्कादायक मानला जात आहे. भास्करराव पेरे पाटील हे गेली २५ वर्षे पाटोदा ग्रामपंचायतीत सरपंच म्हणून कार्यरत आहे. या काळात पाटोदा गावाचा कायापालट करून राज्यात आदर्श गाव म्हणून ओळख मिळवून दिली होती. मात्र, यंदा त्यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता. पण, त्यांच्या कन्या अनुराधा या निवडणुकीत उतरल्या होत्या. मात्र, येथे भास्करराव पेरे यांचे संपूर्ण पॅनलच पराभूत झाले आहे. पाटोदा गावातील ११ जागांपैकी ८ उमेदवार बिनविरोध निवडूून आले होते. तर, बाकीच्या तीन जागांसाठी निवडणूक झाली होती. मात्र, या तिन्ही जागांवर भास्कर पेरे यांच्या पॅनलचा पराभव झाला असून, संपूर्ण ११ जागांवर कपिंद्र पेरे पाटील यांच्या पॅनलने सत्ता मिळविली आहे.
- प्रमोद बायस्कर
(साभार : लोकशाही वार्ता)