नांदगांव पेठ: राष्ट्रीय महामार्गावरून जाणार्या भरधाव ट्रकने दुचाकीस चिरडल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर अन्य एक मित्र गंभीर जखमी झाल्याची दुर्देवी घटना सोमवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास रहाटगाव येथील गिरनार होंडा शोरूम समोर घडली. रुग्णालयातून घरी परततांना दोन मित्रांवर काळाने घाला घातला असून घटनेने एकच हळहळ व्यक्त होत आहे.मनोज राजाभाऊ ढबाळे असे घटनेत मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव असून ऋषिकेश दादाराव घाटोळ असे जखमीचे नाव आहे.दोघेही तिवसा तालुक्यातील वाठोडा खुर्द येथील असल्याची माहिती आहे. मनोज आणि ऋषीकेश दोघेही सकाळी दुचाकी क्र.एम. एच.२७, एस. ९८५७ ने अमरावती येथील खासगी रुग्णालयात आले होते.रुग्णालयाचे काम झाल्यानंतर दोघेही दुचाकी वाहनाने वाठोडा खुर्द येथे परत जात असतांना दुपारी तीन वाजताच्या सुमारास रहाटगाव येथील गिरनार होंडा शोरूम जवळ १८ चाकी मालवाहू ट्रक क्र.ओ.डी.१५,एन ७९५५ ने दुचाकीस धडक दिली.दुचाकी सह मनोज ट्रक च्या मागील चाकात आल्याने मनोजचा चेहरा चेंदामेंदा झाला व तो जागीच ठार झाला. तर मागे बसलेला ऋषिकेश गंभीररित्या जखमी झाला. घटना घडताच घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली. नांदगांव पेठ पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अनिल कुरळकर यांचेसह पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले आणि वाहनांची गर्दी कमी करून जखमी ऋषीकेशला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मनोजच्या कुटुंबियांना मिळताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.नांदगांव पेठ पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील कार्यवाही सुरू आहे.
Related Stories
September 30, 2024
September 29, 2024