मायाच वाटनीवर आली होती
जरी थे गाय असली तरी पन
थे जसी मायी मायच होती
बाप वनवासाले गेल्यापासून
भाकर तुकडा खात नोती
येकटी येकटीच राहात होती
कयपात काई जात नोयती
घळीघळी बापाच्या फोटुले
एकटक न्याहाळत होती
येकांतात हावभाव करून
काईतरीच पुटपुटत होती
कोनी भेटाले आल्या पिच्छा
डोयातून आसू गायत होती
वासराकळ तिचं ध्यान नोयतं
कवकवा हुंदाळी मारत होती
सा मयन्याचं लेकरू झाल्तं
गाय दुधानं सप्पा आटली होती
भुकीनं वासरू सारं केंडलं होतं
तरी ओळ तिले बापाचीच होती
मी तिच्या दुधावरच जगलो होतो
मायसरखी माया केली होती
तिच्या दुधानं घराले अधार होता
घरातली सारी रौनकच गेली होती
रक्ताची नोती पन नात्याची होती
आमच्या घरातली सदस्य होती
तिनं आमाले जीव लावला होता
असी सा-यायची गौरा माय होती
बापाची वाट पावून थकली होती
प्रवासाले निंगाची वक्ता झाली होती
कंबर लागून जागीच बसली होती
येकटक सा-या घराले पाहात होती
– अरुण विघ्ने