- • शिवपरीवाराचा अभिनंदन सोहळा उत्साहात
- • देशातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालयांच्या NIRF यादीत श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावतीने पटकावले स्थान
- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीने नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) रँकिंग – २०२२ अंतर्गत जाहीर देशातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालयांच्या यादीत स्थान पटकावले असून पहिल्यांदाच देशातील सर्वोत्कृष्ट १५० – २०० महाविद्यालयांच्या क्रमवारीत झेप घेतली आहे. महाराष्ट्रातील आठ महाविद्यालयांपैकी विदर्भातील फक्त दोनच महाविद्यालये या यादीत स्थान पटकावू शकले आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे एकमेव महाविद्यालय या यादीत स्थान मिळवू शकले आहे. या अभूतपूर्व यशाच्या उपलब्धी निमित्त महाविद्यालयात अभिनंदन सोहळा पार पडला. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री हर्षवर्धनजी देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी बोलतांना श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचा लौकिक संपूर्ण विदर्भात होताच, परंतु आता देशपातळीवर देखील महाविद्यालयाचा झेंडा फडकल्याचा आनंद त्यांनी अध्यक्षीय विवेचनात व्यक्त केला. हि उपलब्धी महाविद्यालयाच्या प्रत्येक घटकाच्या समर्पित कार्यामुळे प्राप्त झाली असून आता समाजाच्या तसेच श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या अपेक्षा वाढल्या असून महाविद्यालयाची जबाबदारी देखील वाढली असल्याची जाणीव यावेळी अभिनंदन करतांना त्यांनी करून दिली.
तत्पूर्वी व्यासपीठावर उपस्थित महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तसेच श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उच्च शिक्षण संचालक डॉ व्ही. जी. ठाकरे यांनी संपूर्ण चमूचे कौतुक करून या यशाची हवा अती आत्मविश्वासात परावर्तीत होऊ नये. आगामी काळात होऊ घातलेल्या नॅकच्या मुल्यांकन प्रक्रियेत हा दर्जा कायम राखण्याची जबाबदारी प्रत्येक घटकाची असल्याचे त्यांनी सूचित केले.
महाविद्यालयाचे माजी आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ एच. एस. लुंगे बोलतांना म्हणाले की, नॅक मुल्यांकन प्रक्रियेच्या पूर्वी एनआयआरएफ च्या मानांकनामुळे महाविद्यालयाच्या संपूर्ण व्यवस्थेला सकारात्मक उर्जा प्राप्त झाली असून आता अधिक आत्मविश्वासाने कार्य घडेल. यावेळी आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. डब्लू. एस. बरडे यांनी NIRF इंडिया रँकिंग घोषित करण्याची प्रक्रिया समजावत महाविद्यालयाच्या शिक्षण प्रणालीची समग्र गुणवत्ता, संशोधन कार्य, विद्यार्थ्यांच्या उपलब्धी, विस्तार कार्यक्रमांची पोहोच, शिक्षण क्षेत्रातील तज्ञांचे मत आणि इनोव्हेशन अचिव्हमेंट्सवर वर आधारित हि रँकिंग असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागतपर भाषणात महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. जी. व्ही. कोरपे यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख मांडला. महाविद्यालयाच्या सर्व माजी प्राचार्यांचे महत्वपूर्ण योगदान आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या सन्माननीय कार्यकारी परिषदेचे खंबीर पाठबळ असल्यामुळेच आज महाविद्यालयाच्या यशाची पताका गगनात झळकत असल्याची भावना व्यक्त केली. याप्रसंगी त्यांनी संस्थेच्या विद्यमान कार्यकारी परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष श्री हर्षवर्धनजी देशमुख, उपाध्यक्ष श्री नरेशचंद्रजी ठाकरे, डॉ. रामचंद्रजी शेळके, अॅड. गजाननराव पुंडकर, कोषाध्यक्ष श्री दिलीपबाबू इंगोले, तसेच माननीय कार्यकारी परिषद सदस्य श्री हेमंत काळमेघ, श्री केशवराव गावंडे, श्री केशवराव मेटकर, तसेच सचिव श्री शेषरावजी खाडे आणि स्वीकृत सदस्य डॉ. एम. पी. ढोरे, श्री नरेश ठाकरे, श्री पी. एस. वायाळ, डॉ अमोल महल्ले यांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ दिनेश खेडकर तर आभार प्रदर्शन डॉ प्रमोद पडोळे यांनी केले. या सोहळ्यासाठी महाविद्यालयाचे संपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.