बीड : पूर्णवादी अर्थशास्त्राचा नवा विचार पुढे नेण्याची गरज असून या विचारात जागतिक भूकमारीची समस्या मिटविण्याची ताकद आहे “असे प्रतिपादन डॉ. लक्ष्मीकांत पारनेरकर यांनी जळगाव येथे आयोजित सत्कार सोहळ्यात केले.
स्विस स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, जिनेव्हा ,स्वित्झर्लंड कडून अॅड.लक्ष्मीकांत पारनेरकर यांना पूर्णवादी अर्थशास्त्रातील ‘फूड फॉर ऑल’ या विषयासाठी नुकताच पीएचडीचा बहुमान प्राप्त झाला. यानिमित्त जळगाव शहरातील हॉटेल प्रेसिडेंट येथे रविवार ३ जुलै २०२२ रोजी त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन पूर्णवाद परिवाराच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डाॅ.विश्वास पाटील, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील, जळगाव येथील जीवन कला मंडळ अध्यक्ष यशवंतराव चौधरी आदी या वेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. लक्ष्मीकांत पारनेरकर म्हणाले की ,” हा सत्कार सोहळा माझ्यासाठी कृतज्ञता सोहळा आहे.
पूर्णवादी अर्थशास्त्राचा अभ्यास माझ्यासाठी कर्तव्याचा भाग, असून जगातील भूकमारीची समस्या मिटविण्याची ताकद पूर्णवादी अर्थशास्त्राच्या या विचारात आहे, त्यामुळे हा विचार सर्वांनी मिळून पुढे नेण्याची गरज आहे.ज्या युरोपमध्ये पूर्णवाद प्रणेते डॉ. रामचंद्र महाराज पारनेरकर यांना विश्व उत्पत्ती शास्त्रावर पीएचडी मिळवायची होती. ती त्यांची इच्छा दुसऱ्या महायुद्धामुळे अपूर्ण राहिली. दरम्यान डॉक्टर पारनेरकर महाराजांनी पुढे जाऊन पूर्णवादी अर्थशास्त्राचा नवा विचार जगापुढे मांडला याच विचारातील ‘ फूड फॉर ऑल ‘या विषयावर अभ्यास करण्याची व त्याच युरोपमध्ये पीएचडी प्राप्त करण्याची संधी मला मिळाली ही माझ्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे. जगातील प्रत्येक माणसाला अन्न हे मोफत मिळालेच पाहिजे. नव्हे-नव्हे तो त्याचा अधिकारच आहे. त्याला अनुसरूनच डॉक्टर पारनेरकर महाराजांनी “श्रमा पोटी अन्न कोणाचा नियम,असा कसा राम भुके मारी “ असे आपल्या अभिनव अभंगात म्हटले आहे. सिद्धांत हे पुरातन असले तरी ते कालसापेक्ष पद्धतीने शिकवावे लागतात.साऱ्या जगाचं पोट भरेल की नाही असा प्रश्न फक्त डाॅ.पारनेरकर महाराजांनाच पडू शकतो असे डॉ.लक्ष्मीकांत पारनेरकर यावेळी म्हणाले .साऱ्या सहका-यांबरोबर उपस्थित राहण्याचा जो आनंद मिळाला आहे तो अगणित असा आहे असे सांगून प्रज्ञावंतांच्या शहरात आज एका विद्यार्थ्यांचा सत्कार होत आहे ही माझ्यासाठी मोठी भाग्याची गोष्टअसे ते म्हणाले.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. सुरुवातीस अश्विनी हिंगे यांनी स्वागत गीत गायिले. अध्यक्षीय समारोपात बोलतांना डॉक्टर विश्वास पाटील यांनी सभागृहात उपस्थित सर्व समुदाय हा ऋषी आणि कृषी संस्कृतीचा परिचय देणारा असून पीएचडी हा डॉक्टर लक्ष्मीकांत पारनेरकर यांच्या सारस्वत यात्रेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे असे सांगीतले . याप्रसंगी संगीत क्षेत्रात डॉक्टरेट मिळवल्याबद्दल संगीताताई पारनेरकर तसेच शलाका पारनेरकर यांचाही सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर लक्ष्मीकांत पारनेरकर यांचा यावेळी गौरव करण्यात आला. उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत उन्मेश चौधरी ,मकरंद कुलकर्णी यांनी केले.तर सत्कार यशवंतराव चौधरी यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमात ॲड.अमित देशपांडे, जयंत वझे, शिवानी पारनेरकर राजलक्ष्मी पारनेरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली मुळे ,अॅड.निरज अबोटी यांनी, तर आभार प्रदर्शन आशिष अबोटी यांनी केले .कार्यक्रमासाठी देशविदेशातील विविध प्रांतातून आलेले असंख्य युवक युवती, अबालवृद्ध, समाजातील प्रतिष्ठित नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.सत्कार सोहळ्यानिमित्त एका संगीत मैफिलीचे आयोजनही करण्यात आले होते.
- —————–
- अर्थशास्त्राचा नवा विचार पुढे नेण्यासाठी माझा सहभाग
पूर्णवाद परिवाराच्या माध्यमातून चाललेलं हे कार्य नुसतं सामाजिक कार्य नसून वैज्ञानिक दृष्टिकोनातून चालू आहे. डॉक्टर लक्ष्मीकांत पारनेरकर यांनी पूर्णवादी युवा फोरमच्या माध्यमातून भरीव असे कार्य केले असून ज्या देशात समाजासाठी तरुण अधिक संशोधन करतात तो देश श्रीमंत असतो असे ते यावेळी म्हणाले. पूर्णवादी अर्थशास्त्राचा नवा विचार पुढे नेण्यासाठी माझाही सहभाग असेल.
- डॉ. प्रदीप पाटील,
- माजी कुलगुरू