- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : पूरग्रस्त गावात साथीचे आजार उद्भवू नयेत यासाठी विविध निर्देश व सूचना आरोग्य सेवा संचालनालयाने दिले आहेत. त्याचे तंतोतंत पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले.
आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार, पूरग्रस्त गावात वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांचे पथक औषधासह पाठवावे. मोठ्या लोकसंख्येच्या गावात पथकामध्ये कमीत कमी दोन महिला कर्मचारी व दोन पुरुष कर्मचारी यांचा समावेश असावा. छोट्या गावांसाठी एक महिला व एक पुरुष कर्मचारी असावा. वैद्यकीय अधिकाऱ्याने उपचारासाठी पूरग्रस्त गावांचा दौरा करावा व गावात वैद्यकीय पथक चोवीस तास उपलब्ध राहील याची दक्षता घ्यावी.
औषधोपचाराबरोबरच सर्व नागरिकांना निर्जंतुकीकरण केलेल्या पाण्याचा पुरवठा होईल याची काळजी घ्यावी. त्यासाठी ब्लिचिंग पावडर, क्लोरिन टॅब्लेटस्, लिक्विड क्लोरिन यांचा वापर करावा. मुख्यत्वे शहरी व काही ग्रामीण भागातील घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे विस्थापित झालेल्या लोकांसाठी उदा. शाळा, मंगल कार्यालये, देवालये इ. ठिकाणी वैद्यकीय पथकामार्फत आरोग्य तपासणी दररोज करुन औषधोपचार करावा.
पूर परिस्थितीत पिण्याच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करणे काही गावात शक्य नसल्यास जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने टँकरच्या सहाय्याने निर्जंतुकीकरण केलेल्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा. घरोघर सर्वेक्षण करुन जलजन्य आजार उदा. अतिसार, गॅस्ट्रो, कावीळ, विषमज्वर, तापाचे रुग्ण याबाबत सर्वेक्षण करावे. शासकीय यंत्रणेतील इतर कर्मचारी व गावकरी यांच्या सहकार्याने लोकांचे योगदान योग्य ते आरोग्य शिक्षण करावे. काही रुग्णांना रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असल्यास त्यांना नजिकच्या रुग्णालयात संदर्भित करावे. चोवीस तास नियंत्रण कक्ष कार्यरत राहील याची दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
सर्व ठिकाणी औषधांचा साठा उपलब्ध राहील याचे नियोजन करावे. ब्लिचिंग पावडर, क्लोरीन टॅब्लेटस् व अत्यावश्यक औषधांची खरेदी जिल्हा परिषदेच्या स्वत:च्या फंडातून करण्यासाठी जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करावा. पूरग्रस्त भागात जास्तीच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासल्यास पूर परिस्थिती नसलेल्या विभागातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची तात्पुरती नियुक्ती करावी. याउपर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची कमतरता भासल्यास विभागीय उपसंचालकांकडून इतर जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी यांची प्रतिनियुक्ती करुन घ्यावी. पूर परिस्थितीवर संपूर्ण नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यातील इतर खात्यांचा सहभाग घ्यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.