मुंबई : पूजा चव्हाण प्रकरणी पोलिसांकडून जोरात चौकशी सुरू असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. अजित पवारांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना काही जणांना ताब्यात घेतल्याची ऐकीव माहिती असल्याचे सांगितले आहे. तर आम्ही तपास कोणतीही मध्यस्थी करत नसल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले आहे.
अजित पवारांना अरुण राठोडला ताब्यात घेतले आहे का? असे विचारण्यात आले असता ते म्हणाले की, पोलिसांकडे चौकशी करण्यास सांगण्यात आले आहे. आम्ही त्यात कोणतीही मध्यस्थी करत नाही. चौकशी जोरात सुरू आहे. त्यातून काय सत्य आहे ते बाहेर येईल. काहींना ताब्यात घेतल्याची ऐकीव माहिती आहे. मी काही पोलिसांशी संपर्क साधला नाही. कारण नसताना आम्ही सारखे फोन करुन संपर्क साधला तर त्यात राजकीय हस्तक्षेप होतो अशा गोष्टी बोलल्या जातात. त्यापेक्षा अतिशय निर्भीडपणे चौकशी करण्यासाठी आपण सांगितलेले आहे. अजित पवार यांनी यावेळी वनमंत्री संजय राठोड गायब नसल्याचा पुनरुच्चार केला. संजय राठोड गायब आहेत कोणी सांगितले? आजच माझे यशोमती ठाकूर, संजय राठोड, बच्चू कडू यांच्याशी फोनवरुन बोलणे झाले. परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. त्यामुळे लॉकडाउन करण्याचा निर्णय घ्यावा लागेल हे मी त्यांच्या कानावर घातले आहे. राज्याच्या प्रमुखांनी निर्णय घेतला तर त्यांना तो समजलाच पाहिजे. सहकारी असल्याने त्यांना विश्वासात घेणे, माहिती देणे महत्त्वाचे असते, असे अजित पवार म्हणाले आहेत.