अमरावती : सिंचन प्रकल्पाचा लाभ शेतकरी बांधवांना मिळून सिंचनाचे प्रमाण वाढविण्यासाठी अधिकाधिक पाणीवापर संस्थांना चालना मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी जलसंपदा अभियंत्यांनी इतर विभागाच्या समन्वयातून जिल्ह्यात व्यापक मोहिम राबवावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाच्या कामांबाबत आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखडे, आमदार प्रताप अडसड, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, अधीक्षक अभियंता रश्मी देशमुख, कार्यकारी अभियंता श्रीकांत उमप, सुनील राठी यांच्यासह अनेक उपअभियंता यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, जिल्ह्यात कार्यरत पाणीवापर संस्थांचे प्रमाण अत्यल्प आहे. ते सर्वप्रथम वाढविणे क्रमप्राप्त आहे. सर्वत्र पाटचा-या निर्माण होऊन शेतीचे सिंचन वाढविणे आवश्यक आहे. ही कामे मिशनमोडवर केल्याशिवाय पूर्णत्वास जाणार नाहीत. त्यामुळे जलसंपदा अभियंत्यांनी प्रत्यक्ष फिल्डमध्ये उतरून ही कामे हिरीरीने पूर्ण करावीत. केवळ आपले कार्यक्षेत्र एवढेच आपले काम, अशी भावना ठेवू नये. जिल्ह्यात सिंचनाचे प्रमाण वाढविण्यासाठी सांघिक भावनेने काम करणे आवश्यक आहे.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, पाणीवापर संस्थांना चालना देण्याविषयी आपण गतवर्षीच्या बैठकीतच आदेश दिले होते. मात्र, त्यानंतर कार्यान्वित झालेल्या संस्थांची संख्या फारच थोडी आहे. त्यासाठी सर्व प्रकल्पांतर्गत समाविष्ट क्षेत्राचा आढावा घेऊन अपेक्षित कामे तत्काळ हाती घ्यावीत. पाटचा-यांच्या कामांना गती देऊन पाणीवापर संस्थांना चालना द्यावी. १५ जूनपूर्वी किमान १00 ठिकाणी सिंचन सुरळीत होईल, हे उद्दिष्ट ठेवून कामे करावीत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. या कामाचा आपण वेळोवेळी आढावा घेऊ, असेही त्यांनी सांगितले.
Related Stories
September 8, 2024
September 5, 2024