नावासमोर लावून घ्यावीत
मोठी मोठी बिरुदे ..!
समजावे स्वतः स्वतःला
मोठा महापुरुष …
विवेकाचे
नकली अलंकार
जडवून घ्यावेत स्वतःभोवती…..
मारावी मोठी हाक
पाखरांना अज्ञानी समजून…
भरावी त्यांच्या पंखात
खोट्या स्वाभिमानाची हवा..
आपल्या परक्यांची भाषा
द्यावी त्यांच्या ओठी…
वाजवून घ्यावी
आपली टिमकी पाखरांच्या चोचीतून …
जमवावेत पाखरांचे थवेच्या थवे..
सांगून त्यांच्या पूर्वजांचे
अधिष्ठान नवे..
राखून ठेवावं
आपलं अर्धांग
अलिप्त आपल्या नौटंकी विचारापासून…
जगू नये आपण मूलतः
त्यापासून परागंदा होऊन…
स्त्रीत्वाच्या पूर्ण स्वातंत्र्याला दुजोरा देत
पाडून घ्यावीत आपल्याही ओंजळीत ही हिस्सेदारी…!
ठेवावी नजर
आपल्यापासून दूर जाणाऱ्या,
जाऊ शकणाऱ्या, पाखरावरती..
करून घ्यावी
त्यांच्या पंखाची घेरदार छाटणी …
आणि पुन्हा ठेवावा
तो”शो -‘पीस पुसून -पासून आपल्या पिंजऱ्यात..
देऊन टाकावी कबुतरे,पोपट आणि मनभावन मोरांना
उपमा ‘फिनिक्स’ पक्ष्यांची..
आपणही कसे
निखाऱ्याच्या रांगोळ्यावरून चालत आलो आहोत
याची कान भरणी करावी
करत राहावी सारखी सारखी…
दिसू नयेत कधीही
निरंतर आपली तुपात भिजलेली पाची बोटं…!
पाखरांच्या गराड्यात
गुंतून घ्यावे स्वतःला..
समजू नये कुणालाही
मनातल्या मनात
अहितकारक कट्टरवाद्यांशी चालविलेल्या हात मिळवणीची रंगीत तालीम…
आणावा इतका कट्टर आव पाखरांसमोर…
पाखरांनी बोलावी तीच भाषा
जशी त्यांना शिकवली तशीच…
विरोधकांच्या विरोधाचे
भांडवल करून
मिळवावी सहानुभूती
आणि वाढवावा आपल्या कीर्तीचा आलेख
नवीन एखादे आणखी बिरुद लावून आपल्या नावासमोर …!
अभ्यासणारे जाणून असतात
ही नाटकी समाजसेवा…
हा नाटकी कैवार,
आणि संदिग्ध विचाराचा व्यवहार पाखरांना कळेल तेव्हा,
पुकारलेला असेल त्यांनीही एल्गार’
अशा स्वयंघोषिता
विरोधात….!
— प्रा. नंदू वानखडे
मुंगळा जि.वाशिम-9423650468