अमरावती : कृषी पर्यटनास चालना देण्याच्या उद्देशाने या क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थांच्या प्रतिनिधींना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते काल मुंबईत झाला. जिल्ह्यातील रेवसा येथील मीरा ॲग्री गॅलरीचे भरत महल्ले यांनाही यावेळी गौरविण्यात आले.
मुंबईत काल सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे पर्यटन विभागातर्फे विविध उपक्रमांचा शुभारंभ झाला, यावेळी कृषी पर्यटनासाठी कार्य करणा-या संस्थांनाही गौरविण्यात आले. यावेळी पळशीवाडी, ता. बारामती, जि. पुणे, मिर्जापुर, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद, माडखोल, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदूर्ग, कुनकेरी, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग, येरळ, ता. रोहा, जि. रायगड, कन्नाई धारपी, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदूर्ग, तांदुळवाडी, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर यांच्यासह रेवसा, जि. अमरावती येथील भरत महल्ले यांचे मीरा ॲग्री गॅलरी यांना नोंदणी प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. पर्यटन मंत्री श्री. ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री कुमारी अदिती तटकरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना आता चित्रपट, टीव्ही मालिका इत्यादींचे प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या ठिकाणी जाऊन चित्रीकरण (लाईव्ह शुटींग) पाहण्याची तसेच कलाकारांसमवेत संवाद साधण्याची संधी मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालय आणि स्टारक्राफ्ट मनोरंजन प्राईम लिमिटेड यांच्यामध्ये यावेळी सामंजस्य करार करण्यात आला.
राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळांवर त्या ठिकाणांचा इतिहास, वैशिष्ट्ये आदींची माहिती देणारे ऑफलाईन क्यूआर कोडचे फलक लावण्यात येणार असून यासाठी पोलक्स स्टार एलएलपी यांच्यासमवेत सामंजस्य करार करण्यात आला. मुंबईत पुढील महिन्यात होणाऱ्या दी मुंबई फेस्टीव्हलसंदर्भात तसेच राज्यातील खाद्यसंस्कृतीला चालना देणारे सामंजस्य करारही यावेळी करण्यात आले. याशिवाय राज्यात विविध भागात सुरु झालेल्या कृषी पर्यटन केंद्रांना नोंदणी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
राज्यातील खाद्यसंस्कृतीस चालना देण्यासाठी तसेच स्थानिक व घरगुती पदार्थ पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी फुड लाईफसोबत सामंजस्य करार करण्यात आला. त्यामुळे पर्यटकांना अधिकृत महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ मिळण्यास मदत होणार आहे.
राज्यातील पर्यटनस्थळांची माहिती, रस्त्यांना व चौकांना दिलेल्या नावांचा इतिहास यांचा ऑफलाईन क्युआर कोड बनवून पर्यटकांना ती माहिती उपलब्ध करून देण्यासाठी पोलक्स स्टार एलएलपी यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आला. तसेच मुंबई फेस्टिवलसाठी एक्सप्लोरबी प्रा. लि. यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आला. मुंबईमध्ये 25 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2021 या कालावधीत या फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात येणार आहे.
कोरोनानंतरच्या काळात जगभरातील पर्यटकांसाठी महाराष्ट्र हे महत्त्वाचे पर्यटनस्थळ म्हणून नावारुपाला आणण्यासाठी कटिबद्ध असून राज्याच्या कृषी पर्यटन धोरणाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात येत आहे. कृषी पर्यटनाचा विकास करणे हे ध्येय आहे, असे मंत्री श्री.ठाकरे यांनी सांगितले.
Related Stories
September 8, 2024
September 5, 2024