अरूण हरिभाऊ विघ्ने यांचा नागपूरच्या मध्यमा प्रकाशनाने प्रकाशित केलेला ‘ उजेडाच्या दिशेने निघालो’ हा चौथा कविता संग्रह .पक्षी ,वादळातील दीपस्तंभ ,जागल हे तीन आधीचे कवितासंग्रह . अर्थातच या संग्रहातील कविता ही नवखेपणापासून दूर असणे स्वाभाविक आहे . कविता लेखनाची कवीचीही एक निश्चित भूमिका आहे .’ जे भोगलं ,जगलो ,अनुभवलं,बघितलं आजूबाजूच्या निरीक्षणातून मला जे जाणवलं ते सामाजिक जाणिवेतून समस्त रचनांमध्ये ( या संग्रहात एकूण 82 कविता ) मांडण्याचा प्रयत्न केला आहे …..’ ह्या पार्श्वभूमीवर ‘ ….प्रत्येक झोपडीने ,घराने गावाने शिक्षणाची कास धरली पाहिजे आणि आपल्या प्रवासाचा मार्ग निश्चित केला पाहिजे .मग तो कुणीही असो .कामगार ,कष्टकरी ,शेतकरी,पीडित ,शोषित ,वंचित या सर्वांनी आपली शैक्षणिक अवजारं सुसज्ज केली पाहिजे. हा देश सर्वांचाच आहे .सुख,समाधान, न्याय ,
अधिकार,सलोखा नांदविण्यासाठी कायद्याचे रक्षण केले पाहिजे .तरच येथे जीवन जगताना प्रत्येकाला मोकळा श्वास घेता येईल .’ या सुत्राचा काव्यात्म विस्तार आणि आविष्कार म्हणजे ही कविता .
अंधाराचा विचार केला तर हा सर्वत्र व्यापलेला अंधार कवीला आपल्या झोपडीतही शिरलेला दिसतो.’हा अंधार कसला /झोपडीत माझ्या/’(पृ.53)असा प्रश्नही तो करतो . हा अंधार आजचा नाही .तर तो ‘पिढ्यानपिढ्यांचा होता’(पृ-320) याची जाणीवही कवीला आहे .या अंधाराची कवीला एवढी भीती का वाटते ?त्याचीही कारणं आहेत . पैकी एक –‘ रजनीच्या कुशीत /निवांत विसावलेलं गाव माझं /….’ एका रात्री ‘…पूर्वजांनी जिवापाड जपलेल्या एकतेची /संधीसाधू धर्मांध शक्तीने केलेली होळी /माझ्या गावाची /’(पृ-93) उघड्या डोळ्यांनी कवीला पाहावी लागली . यापेक्षा भीषण क्रौर्य ते काय असू शकते ?आणि हे एका दिवसाचं नाही . तर ‘तो नेहमीच असतो अंधारात दबा धरून बसलेला भेकडासारखा /…’(पृ-62)हे कायमचं संपलं पाहिजे असं कवीला तीव्रतेने वाटते . ते एकट्या कवीलाच वाटून पुरेसे नाही . तर ‘दिव्यांनीच ठरवावं आपापलं /कुठे कुठे पेटून प्रकाशायचं /कुठला अंधार करावा नाहीसा /आणि कुठे आपसूक विझायचं /’(पृ-27).हे दिव्यांना हवं तेव्हा प्रकाशायचं अन हवं तेव्हा विझायचं तत्वज्ञान जेव्हा मिळालं त्या क्षणाचा ‘साक्षीदार’.’ खुद्द कवीच आहे . ‘मी जन्मलो तेव्हा /विषमाच्छादित रात्रीच्या गर्भातून /समतेचा नवा सूर्य उगवला होता /’(पृ-58 ) अर्थातच त्या समतेच्या सूर्याचं नाव ‘बाबासाहेब ‘(पृ-63). ‘तुम्हीच झालात अंधारातल्या प्रकाशवाटा ‘(पृ-63 )असा कवी त्यांचं यथोचित गौरवगीत गातो . आणि मग अंतिमतः करूणाकार बुद्धाला शरण जावून कवी ‘आता तुझाच अष्टांग मार्ग चोखाळणार आहे बुद्धा ‘(पृ-36)अशी निःसंदिग्धपणे कबुली देतो . ‘ जखमांना तुझ्या करूणेचा ओलावा उभारी देईल या अपेक्षेने /….’ कवी’ भरकटलेली पावलं /तुझ्याकडेच येत आहेत शांतीदुता /मी उजेडाच्या दिशेने निघालो आहे /’ (प-36) असा स्पष्ट निर्वाळा देतो .
अरूण विघ्ने यांच्या या संग्रहातील एकूण कवितांचा आवाका असा मनाला आतून स्पर्श करणारा आहे. अवघ्या जगात ‘व्हावे कल्याण सर्वांचे | कोणी दुःखी असू नये ||’ ही कवीची सर्वसमावेशक भूमिका आहे .अर्थात ही बाब वाटते तितकी सोपी नाही .ही आपली काटेरी जीवननिष्ठा आपल्या होऊ घातलेल्या जीवनसंगिणीला कवी उघडपणे समजावून सांगताना म्हणतो –‘ तू काट्यामधले फ़ूल गडे /मी फ़ुलाभोवतीचा काटा /तू चालणार जी सप्तपदी /लाल भासती पाऊलवाटा /’(पृ-110). तो तिच्याशी असे निर्वाणीचे का बोलतो ? तर त्याचे अशा नाजूकसाजूक गोष्टींच्या बाबतीतले अनुभव अपेक्षाभंग होतील असे आहेत .’काळीज फ़ाटले हे प्रेमात कैकदा हो /’(पृ-132) ही त्याच्या अंतरीची भळभळणारी जखम आहे. हे एकच नाते नाही तर अशी उसवलेली अनेक नाती ‘घागा माणुसकीचा ,शिवतो फ़ाटलेली नाती /आणि दुभंगलेली मने अविरत /’(पृ-37) हळव्या मनाने जोडण्याचा प्रयत्न करतो .याचं कारण अलीकडेच ‘माणसाला माणसाशी जोडले भीमाने ‘(पृ-121) या कल्याणकारी परंपरेचे भान त्याला प्राप्त झाले आहे. यातूनच ‘आता मला राखण करायची आहे /भीमाच्या बागेची जागल्या होऊन /’(पृ-86) ही तत्वनिष्ठा तो अंगिकारतो. आणि ती जपण्यासाठी ‘बाणा असेल माझा हा ताठ नेहमी ‘(पृ-137) ही जाणीव मनात सदैव जागृत ठेवतो .कवीची ही सजगता किती व्यापक होत जाते हे सहज लक्षात येते.
एकूणच कवीचे आस्थाविषय आणि ते साकारण्याची चिंतनशील कृतिपरता याची काहीशी झलक माझ्या या विवेचनातून दिसून येईल अशी अपेक्षा करतो . अर्थात हे एवढ्यावरच संपत नाही . याशिवाय आणखी काय या एकूणच कवितेच्या बुडाशी आहे ते जाणून घेण्याची आणि त्यासाठी रसिक वाचकांची मूळ कविता संग्रह वाचण्याची अभिलाषा या छोट्याशा लेखाद्वारे तीव्र होवो. असा आशावाद व्यक्त करून थांबतो.
- – बाबाराव मुसळे,
- -9325044210
- – मी उजेडाच्या दिशेने निघालो (कविता)
- – अरूण विघ्ने
- – मध्यमा प्रकाशन ,नागपूर
- – पृ-144 किंमत-220/-