देहू : पंढरीची वारी ही समतेचे प्रतीक आहे, ज्या शिळेवर बसून तुकोबारायांनी १३ दिवस कठोर उपासना केली ती शिळा भक्ती आणि ज्ञानाची आधारशिळा असून, केवळ भक्तीचेच नव्हे तर भक्तीच्या शक्तीचे हे केंद्र आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांप्रति आपला आदरभाव व्यक्त केला.
मंगळवारी दुपारी देहू येथील संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त व मान्यवर उपस्थित होते.
मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठी अभंगांनी करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली. मोदी यांनी आपल्या भाषणात तुकोबांच्या कार्याचा आढावा घेताना त्यांच्या अभंगांनी आणि त्यांच्या कार्याने सामज घडविण्याचे काम केल्याचे सांगितले. जो भंग होत नाही आणि जो शाश्वत असतो तो अभंग तुकोबाराय आणि महाराष्ट्रातील संतांच्या परंपरेने शाश्वततेला सुरक्षित ठेवत राष्ट्राला गतिशीलही ठेवले. त्यांच्या अभंगांनी अनेक पिढ्यांना मार्गदर्शन तर केलेच पण ते देशाच्या भविष्याचा आशेचा किरणही बनले, असे मोदी म्हणाले.
छत्रपती शिवराय आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांसाठीही तुकोबारायांचे अभंग उर्जा स्त्रोत राहिल्याचे सांगतानाच भेदाभेद अमंगळ या तुकोबांच्च्या अभंगाचे उदाहरण देताना त्यांनी राष्ट्रीय एकात्मता कायम राखण्यासाठी, देशातील समानतेच्या तत्त्वाचा तो आधार असल्याचे सांगितले.