- * नेरपिंगळाई येथील रस्त्याबाबत आढावा
- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : नेरपिंगळाई येथे निर्माण करावयाच्या रस्त्याबाबत ग्रामस्थ बांधवांचे म्हणणे विचारात घेऊन, तसेच प्रत्यक्ष पाहणी करून योग्य कार्यवाही करावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.
मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई गावात आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या रस्त्याबाबत ग्रामस्थ बांधवांच्या तक्रारी लक्षात घेऊन अभियंते व अधिका-यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी पालकमंत्री श्रीमती ठाकूर बोलत होत्या. जिल्हाधिकारी पवनीत कौर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरूंधती शर्मा, कार्यकारी अभियंता एस. पी. थोटांगे यांच्यासह नेरपिंगळाई येथील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
नेरपिंगळाई येथे एडीबी बँकेच्या सहकार्याने रस्ता निर्माण होत आहे. त्याबाबत ग्रामस्थांच्या काही तक्रारी आहेत. त्या विचारात घ्याव्यात. ग्रामस्थ बांधवांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे जाणून घ्यावे. सर्वांचे सहकार्य मिळवून रस्त्याचे काम पूर्णत्वास न्यावे. त्यासाठी अभियंत्यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या कामांचा आढावाही पालकमंत्र्यांनी घेतला. आवश्यक रस्त्यांबाबत प्रस्ताव द्यावेत. आवश्यक कामांसाठी निधी मिळवून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.