आपल्या पावलामध्ये साधारण २६ छोटी हाडे, ३0 सांधे आणि १00 हून अधिक स्नायू आणि लिगामेंट आहेत. पाठीचा कणा ३३ मणक्यांपासून तयार झालेला आहे. पाठीचा कणा मानेपासून माकडहाडापर्यंत आहे. इतकी मोठी हाडांची श्रृंखला शरीरामध्ये इतरत्र कोठेही नाही; पण मग या छोट्याशा पावलामध्ये इतक्या छोट्या हाडांची रचना आणि स्नायू का दिले असतील? तर एकाच वेळेस पावलाने शरीराचा तोल सांभाळून स्थिरता मिळवावी, पावलाने हालचाल करून चालण्याची क्रिया करता यावी, एका जागेवर स्थिर असताना शरीराचे वजन योग्य पद्धतीने मध्य रेषेपाशी राहील याची काळजी घेता यावी, असे परस्परविरोधी; परंतु महत्त्वाचे कार्य या छोट्याशा पावलाला करावे लागते. पाऊल हे शरीराला बसणारे धक्के सहन करणारा अवयव (शॉक अब्झॉर्बर) आहे. शरीराचा तोल सांभाळण्यात पावलाचे कार्य महत्त्वाचे आहे. वृक्षासनामध्ये हाच संबंध अधोरेखित करून एका पायावर संपूर्ण शरीराचा तोल सावरण्याचा आपण प्रयत्न करतो. एखादा वृक्ष जमिनीवर जेवढा विकसित झालेला असतो, तेवढी त्याची मुळे जमिनीच्या खाली, जमिनीला घट्ट धरून वृक्षाला स्थिर करतात. त्याचप्रमाणे पावलामध्ये असलेल्या छोट्या-छोट्या हाडांची रचना शरीराची उंची आणि वजनाला स्थिर करतात. पावलामध्ये अंगठ्याच्या खाली, करंगळीच्या खाली आणि टाच असे तीन बिंदू जोडून त्रिकोण तयार होतो. ज्या त्रिकोणावर आपले शरीर एका पायावरदेखील स्थिर राहू शकते.
कृती : दोन्ही पायांवर सरळ उभे राहावे. पाऊल एकमेकांना समांतर असावे. हळूहळू डावा पाय वर उचलून गुडघ्यात वाकवून पाऊल उजव्या पायाच्या मांडीपयर्ंत वर आणावे. डाव्या पायाची टाच वर आणि पाऊल खाली, अशी स्थिती असावी. डाव्या पायाचा गुडघा जांघेपासून बाहेर वळलेला असावा. नजर समोर स्थिर असावी. हळूहळू सावकाश श्वास घेत दोन्ही हात नमस्काराच्या स्थितीत वर ताणून घ्यावेत. दोन्ही हातांच्या मदतीने ताडासनाप्रमाणे पाठीचा कणा आणि छातीचा पिंजरा डोक्याच्या दिशेने वर ताणून घ्यावा.
कमरेपासून एका पायावर स्थिर राहून श्वासावर लक्ष एकाग्र करावे. या स्थितीमध्ये श्वास आणि नजर खूप महत्त्वाची आहे. श्वास अतिशय नियंत्रित, संयमित आणि दीर्घ असावेत. जेवढे श्वासावर नियंत्रण ठेवता येईल, तितकी मनाची एकाग्रता वाढते. त्याचप्रमाणे शरीराची स्थिरता वाढते. नजरदेखील स्थिर असावी. नजर जेवढी एकाग्र असेल, तेवढा आपल्या पावलाचा त्रिकोण जास्त कार्यान्वित होईल आणि स्थिर होईल. योगासनांत नजरेच्या एकाग्रतेला खूप महत्त्व आहे. डोळ्यांचे आरोग्य या लेखात आपण त्राटक या विषयावर माहिती घेतलेली आहे.
Related Stories
September 3, 2024